बेळगाव लाईव्ह : कर्नाटक पदवीपूर्व शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत बेळगावच्या केएलएस गोगटे कॉमर्स आणि सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी ध्वनी संतोष कुलकर्णी हिने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. ध्वनीने वाणिज्य विभागात ६०० पैकी ५९९ गुण मिळवून बेळगाव जिल्ह्यात प्रथम आणि संपूर्ण कर्नाटक राज्यात द्वितीय क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला. तिच्या या यशाने केवळ गोगटे कॉलेजचेच नव्हे, तर संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे नाव राज्याच्या शैक्षणिक पटलावर उंचावले असून सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ध्वनीच्या या यशाचे वैशिष्ट्य म्हणजे तिने सहापैकी पाच विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तिने संस्कृत, बिझनेस स्टडीज, अकाउंटन्सी, स्टॅटिस्टिक्स आणि बेसिक मॅथेमॅटिक्स या पाच विषयांत १०० पैकी १०० गुण पटकावले, तर इंग्रजी विषयात ९९ गुण मिळवून आपली विद्वत्ता सिद्ध केली.
आपल्या यशाच्या प्रवासाविषयी माहिती देताना ध्वनीने सांगितले की, हे यश कोणत्याही शॉर्टकटने मिळालेले नसून त्यामागे सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. तिने परीक्षेचा कोणताही बाऊ न करता दररोज केवळ १ ते १.५ तास नियमित आणि एकाग्रतेने अभ्यास करण्यावर भर दिला. विशेष म्हणजे, बोर्डाच्या मुख्य परीक्षेपूर्वी महाविद्यालयाने घेतलेल्या ‘सराव’ परीक्षांचा तिला मोठा सराव झाला, ज्यामुळे मुख्य परीक्षेत वेळेचे नियोजन करणे आणि आत्मविश्वासाने उत्तरे लिहिणे तिला सोपे गेले.

डिव्हाईन प्रॉव्हिडन्स स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ध्वनीने गोगटे कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. तिला भविष्यात सीए (चार्टर्ड अकाउंटंट) होऊन याच क्षेत्रात नाव कमवायचे आहे. तिच्या या स्वप्नाला कुटुंबाचे मोठे पाठबळ लाभले आहे. तिचे वडील संतोष कुलकर्णी हे सध्या दोहा-कतार (ICC) येथे तबला कलाकार म्हणून कार्यरत असून आई गृहिणी आहे. तसेच तिची मोठी बहीण सध्या सीए फायनलचा अभ्यास करत असून तिचे मार्गदर्शन ध्वनीला मोलाचे ठरले.
गोगटे कॉलेजचे प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक तसेच पालकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे यश गाठता आले, अशी भावना तिने व्यक्त केली. स्वतःवर विश्वास ठेवून आणि योग्य मार्गदर्शनाखाली नियमित अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते, असा संदेश तिने आपल्या यशाच्या निमित्ताने तरुण पिढीला दिला आहे.
गोगटे कॉलेजचा पीयूसी परीक्षेत डंका
वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा निकाल ९२.२६ टक्के
ध्वनी कुलकर्णी राज्यात द्वितीय तर वाणिज्य शाखेत जिल्ह्यात प्रथम
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक पदवीपूर्व शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत टिळकवाडी येथील केएलएस गोगटे कॉमर्स आणि सायन्स पीयू कॉलेजने ९२.२६ टक्के निकाल मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. वाणिज्य शाखेतील ध्वनी कुलकर्णी हिने ६०० पैकी ५९९ गुण मिळवून राज्यात द्वितीय आणि जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला असून, कॉलेजच्या एकूण १०२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
वाणिज्य शाखेमध्ये ध्वनी कुलकर्णी (५९९) हिने प्रथम, एकता पुरोहित (५९४) हिने द्वितीय, तर गौरिका बजाज (५९३) हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच दिव्या तुबाची (५९१) आणि वैष्णवी उम्मी व यशिका श्री (प्रत्येकी ५९०) यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला. वाणिज्य विभागातील ७१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
विज्ञान शाखेमध्ये लक्ष्य राव याने ५९२ गुणांसह कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. पार्थ कुलकर्णी, सावनी उत्तरकर आणि सिम्रन पाटील यांनी प्रत्येकी ५८२ गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. ऋतिका पाटील (५७५) तृतीय, प्रीती भांडुर्गे (५७१) चतुर्थ, तर ओजस पाटील (५७०) पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला. विज्ञान विभागातील ३१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.
या यशाबद्दल केएलएस संस्थचे अध्यक्ष ए. के. तागरे, सचिव व्ही. एम. देशपांडे, एस. व्ही. गणचारी, गोगटे पीयू कॉलेज गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष आर. एस. मुतालिक आणि प्राचार्य डॉ. ए. एस. केरूर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशात महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून संपूर्ण शहरातून या गुणवंतांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




