बेळगाव लाईव्ह :येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) गावाजवळ रस्त्याशेजारी शेताजवळ प्लास्टिक बाटल्यांसह केरकचऱ्याचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायतने त्याची तात्काळ उचल करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून येळ्ळूर गावाजवळ रस्त्याशेजारी शेतालगत प्लास्टिक बाटल्यांसह मोठ्याप्रमाणात कचरा साचत आहे. जोरदार पावसात पावसाच्या पाण्याबरोबर हा कचरा शेजारील शेतांमध्ये पसरून शेतजमीन दूषित होऊ लागली आहे.
यासंदर्भात यापूर्वी वारंवार तक्रार करून, तसेच लेखी निवेदन देऊन देखील येळ्ळूर ग्रामपंचायतीकडून दखल घेतली जात नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळा जवळ येत चालला आहे, तेंव्हा आता तरी ग्रामपंचायतीने जागरूकता दाखवून गावाजवळील रस्त्याशेजारी साचलेला प्लास्टिक बाटल्यांसह इतर केरकचरा युद्धपातळीवर हटवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.





