बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील भाविकांसाठी एक मोठी धार्मिक भेट लवकरच साकार होणार आहे. बेळगाव तालुक्यातील के.के. कोप्प गावाजवळ तब्बल सात एकर प्रशस्त जागेवर तिरुपती बालाजी मंदिर उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थान आणि बेळगाव रेड्डी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात असून, सदाशिवनगर येथील रेड्डी भवनमध्ये मंगळवारी जमीन हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. रेड्डी संघाने मंदिरासाठी आवश्यक असलेली सात एकर जमीन स्वखर्चाने उपलब्ध करून दिली आहे.
या प्रकल्पाबाबत माहिती देताना टीटीडी प्रशासन मंडळाचे सदस्य एस. नरेश कुमार यांनी सांगितले की, मंदिराचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून येत्या महिन्याभरात भूमिपूजन आणि पायाभरणी होणार आहे.
सुमारे १०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यातील ८० टक्के निधी टीटीडीकडून, १० टक्के रेड्डी संघाकडून आणि उर्वरित १० टक्के निधी स्थानिक नागरिक व भाविकांच्या देणगीतून उभारला जाणार आहे. प्रकल्पासाठी स्वतंत्र ट्रस्ट स्थापन केला जाणार असून त्यामध्ये स्थानिक प्रतिनिधींनाही स्थान दिले जाणार आहे.

तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या बेळगावचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेता, या मंदिरामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तिरुपतीप्रमाणेच येथेही नित्यपूजा, विविध धार्मिक कार्यक्रम, अन्नदान सेवा आणि प्रसाद वितरणाची व्यवस्था केली जाणार आहे. भाविकांसाठी निवास, पार्किंग आणि इतर सोयीसुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
विशेष म्हणजे, तिरुपतीपर्यंत सुमारे ९०० किमीचा प्रवास करण्याऐवजी आता भाविकांना बेळगावातच ‘तिरुपती’चे दर्शन घेता येणार असल्याने या प्रकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





