belgaum

बेळगाव मनपाकडून 26 दिव्यांगांना इलेक्ट्रिक मोपेडचे वितरण

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेच्या 5 टक्के राखीव निधीतून दिव्यांगांसाठी खरेदी करण्यात आलेल्या 26 इलेक्ट्रिक तीन चाकी मोपेड वितरणाचा कार्यक्रम आज गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.

बेळगाव महापालिकेच्या मुख्य कार्यालय आवारात आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर प्रीती कामकर, बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ आणि उपमहापौर हनुमंत कोंगाली उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी असलेल्या 26 दिव्यांग स्त्री-पुरुषांना इलेक्ट्रिक तीन चाकी मोपेडचे वितरण करण्यात आले.

महापालिकेकडून दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी आणि लाभार्थींचे हितचिंतक हजर होते. लाभार्थी निवड, प्रशासकीय प्रक्रिया आणि वितरण कार्यक्रम निश्चित न झाल्याने गेल्या 3 महिन्यांहून अधिक काळ खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक तीन चाकी मोपेड महापालिका कार्यालयाच्या आवारात पडून होत्या. तथापि आजच्या कार्यक्रमामुळे त्यांच्या वितरणाचा रखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे.

 belgaum

कार्यक्रमानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आमदार असिफ सेठ यांनी महापालिकेकडून 38.69 लाख रुपये खर्च करून आमच्या दिव्यांग बंधू-भगिनींना आज 26 इलेक्ट्रिक मोपेड वाहनांचे वितरण करण्यात आले आहे.

दिव्यांगानी कोणावर अवलंबून न राहता स्वावलंबी व्हावे, त्यांना सुलभ संचार करता यावा या उद्देशाने महापालिकेकडून हा उपक्रम राबविण्यात आला आहे अशी माहिती देऊन या पद्धतीने भविष्यातही दिव्यांगांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न महापालिका व सरकार करेल, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.