बेळगाव लाईव्ह :अलतगा (ता. जि बेळगाव) येथील सर्व्हे नं. 87 मधील 4 एकर 38 गुंठे जमिनीवर अतिक्रमण केले जात असून हे अतिक्रमण ताबडतोब थांबवावे, अशी मागणी गावकऱ्यांनी बेळगाव तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
अलतगा येथील देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत, चेतक कांबळे व पिराजी पावशे यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी सकाळी तहसीलदारांना सादर करण्यात केले. अलतगा ग्रामपंचायत व्याप्तीतील सर्व्हे नं. 87 मधील 4 एकर 38 गुंठे जमिनी संदर्भात न्यायालयाने ती जमीन अलतगा गावकऱ्यांची असल्याचे घोषित करून तसा आदेश दिला आहे.
मात्र आता सदर जमिनीवर रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे नाव पुढे करून भू -माफिया गावकऱ्यांना त्रास देऊन सदर जमीन बळकावू पाहत आहेत. संबंधित रामेश्वर देवस्थान ट्रस्ट बेळगाव यांच्याकडे जमिनीवर मालकी हक्क सांगणारी कोणतीही कागदपत्रे नाहीत. कारण रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गोविंद कुलकर्णी यांनी 1987 मध्ये बेंगलोर उच्च न्यायालयात सदर जमीन अलतगा गावकऱ्यांनाच मिळाली पाहिजे अशी जबानी दिली आहे.
त्यानुसार संबंधित जमीन अलतगा गावकऱ्यांच्या मालकीची आहे असा आदेश के.एल.आर. यांनी दिला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण सर्व्हे नं. 87 मधील 4 एकर 38 गुंठे जमिनीवरील अतिक्रमणाला आळा घालून गावकऱ्यांना न्याय द्यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी अलतगा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदन सादर केल्यानंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना देवस्थान कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत धुडूम यांनी सांगितले की, अलतगा गावातील येथील सर्व्हे नं. 87 मधील 4 एकर 38 गुंठे जमिनीबाबत गावातील राजाई परिवार आणि गावकरी यांच्यामध्ये जवळपास 60 वर्षे खटला सुरू होता. सदर जमीन ही हलदगे गावकऱ्यांची असून त्याला आमचा कोणताही विरोध नाही अशी स्पष्ट जबानी श्री रामेश्वर देवस्थान बेळगावच्या पुजाऱ्यांनी न्यायालयात दिली आहे. ही वस्तुस्थिती असताना बेळगाव येथील अभिजीत भातकांडे यांनी श्री रामेश्वर देवस्थान कडून आम्ही जीपी घेतला आहे असे सांगून संबंधित जमिनीवर हक्क सांगत देवस्थानाचा फलक लावला आहे.

त्यांना विनंती आहे की त्यांनी तो फलक तात्काळ हटवून ती जमीन पूर्ववत गावकऱ्यांच्या स्वाधीन करावी अन्यथा ग्रह आंदोलन छेडले जाईल असा इशारा देऊन आमचे गाव आमदार सतीश जारकीहोळी यांच्या यमकनमर्डी मतदारसंघात येते तेव्हा अशी दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही, अशी ताकीदही अध्यक्ष धुडूम यांनी दिली. अन्य एका गावाप्रमुखाने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आमच्या गावातील सर्व्हे नं. 87 मधील 4.5 एकर जमीन गेल्या शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापासून गावच्या देवस्थान पंच कमिटीच्या ताब्यात आहे.
आता बेळगावातील कांही लोक त्या जमिनीवर आपली मालकी सांगून ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा आम्ही गावकरी निषेध करतो. तसेच त्यांनी संबंधी जमिनीवर लावलेला फलक तात्काळ हटवावा, अन्यथा उग्र आंदोलन हाती घेतली जाईल. याव्यतिरिक्त या पद्धतीने प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही अलतगे गावातील कांही लोकांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत, असे सांगितले.




