belgaum

तीन वर्षांत राज्यात एकही सांप्रदायिक दंगल नाही : गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर

0
221
 belgaum

बेळगाव लाईव्ह: राज्यात गेल्या तीन वर्षांत एकही सांप्रदायिक दंगल झालेली नाही, असे विधान राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी केले. शुक्रवारी बेळगाव शहरात पोलिसांच्या विविध इमारतींच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर तीन वर्षे पूर्ण झाली असून, या काळात कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यात पोलिस यंत्रणेने प्रभावी कामगिरी केली आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने ड्रग्स पुरवठादार व तस्करांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली असून, गेल्या एका वर्षात हजारो कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. समाजविघातक कृत्य करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

 belgaum

शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम पोलिस करत आहेत. ड्रग्सविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सामान्य गुन्ह्यांमध्ये घट होत असली तरी सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः निवृत्त नागरिकांच्या खात्यांना लक्ष्य केले जात असल्याने सायबर गुन्हे रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब उभारून पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगाव जिल्ह्यात सुमारे 67.79 कोटी रुपयांच्या खर्चातून पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांची उभारणी केली जात आहे. शहापूर येथेही नवीन निवासस्थानांच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दर्जेदार व सुसज्ज घरे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला असून, प्रत्येक घरासाठी सुमारे 38 लाख रुपये खर्च केला जात आहे.

पोलिसांनी कर्तव्य बजावताना घरच्या समस्यांची चिंता नसावी, यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी पोलिस निवास प्रकल्पांसाठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, पोलिस विभागाला अधिकाधिक सुविधा देण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

कर्नाटक पोलिसांनी देशात न्याय मिळवून देण्याच्या बाबतीत अग्रक्रम मिळवला असून, त्यांचे काम समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस ठाण्यांचे आधुनिकीकरण करण्यात आले असून, जनस्नेही पोलिस प्रशासन राबवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी 174 सुसज्ज पोलिस निवासस्थानांची उभारणी करण्यात आल्याची माहिती दिली. पोलिस कर्मचारी सण-उत्सव बाजूला ठेवून सतत कर्तव्य बजावत असतात. त्यांना आरामदायी निवास मिळावा यासाठी दर्जेदार घरे बांधण्यात आल्याबद्दल त्यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले.

कार्यक्रमास महांतेश कौजलगी, जिपं सीईओ राहुल शिंदे, एडीजीपी हितेंद्र, आयजीपी डॉ. चेतनसिंग राठोड, शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलिस अधीक्षक के. रामराजन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.