belgaum

युनियन जिमखाना परिसरात फायरिंग पाहणी, तपास सुरू

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयाच्या शेजारी असलेल्या युनियन जिमखाना क्लबमध्ये मंगळवारी रात्री थरारक फायरिंगची घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार सुरेश नामक एक जण रमी क्लबमध्ये खेळत असताना पाच जणांचा एक गट तेथे आला. त्यापैकी दोन जण क्लबबाहेर थांबले, तर तीन जण आत प्रवेश करून सुरेश यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी एका आरोपीने सुरेश यांच्या डोक्यावर बंदूक रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सुरेश यांनी आरोपीला जोरात ढकलून तेथून पळ काढल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. त्यानंतर आरोपी क्लबबाहेर येत हवेत आणखी दोन गोळ्या झाडून घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.

 belgaum

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची तपासणी करून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.

पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर सुरेश तेथे आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.

पोलिसांनी सुरेश जाळगार यांची चौकशी केली असून, त्यांनी यापूर्वी झालेल्या एका गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सूडबुद्धीने हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

ही घटना कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे. तसेच फायरिंगमागील नेमके कारण, आरोपींची ओळख आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उलगडण्यासाठी तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.