belgaum

दशकांनंतर आशेचा किरण! हक्कीपिक्की, कातकरी वसाहतीत प्रशासन पोहोचले

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील हत्तरगुंजी गावातील इंदिरानगर येथे राहणाऱ्या हक्कीपिक्की आणि कातकरी आदिवासी समाजासाठी मंगळवारचा दिवस आशेचा किरण ठरला. अनेक दशकांपासून शिक्षण, आरोग्य, शुद्ध पिण्याचे पाणी, आधार कार्ड आणि इतर मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या या कुटुंबांच्या दारी प्रथमच जिल्हा प्रशासन पोहोचले.

हलकर्णी ग्रामपंचायत हद्दीतील या छोट्याशा वसाहतीतील अनेक कुटुंबे आजही अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत आहेत. मुलांच्या शिक्षणाची सोय नाही, आजारी पडल्यास उपचारासाठी संघर्ष करावा लागतो, तर अनेकांकडे आधार कार्डसारखी मूलभूत कागदपत्रेही नाहीत. वर्षानुवर्षे या समस्या कायम असतानाही त्यांची दखल घेतली जात नव्हती.

मात्र, कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीने या समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर प्रशासन जागे झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह वसाहतीला भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यांच्या अडचणी ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

 belgaum

पाहणीदरम्यान मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, आरोग्य सुविधा, शुद्ध पिण्याचे पाणी, घरकुलासाठी जागा आणि आधार कार्डसह आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.

या भेटीमुळे अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य उमटले आहे. आता प्रशासनाच्या आश्वासनांचे प्रत्यक्ष कामात रूपांतर होऊन या कुटुंबांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.