बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेतील बहुचर्चित पीआयडी घोटाळ्याच्या चौकशीला चार महिने उलटले, मात्र अद्याप अंतिम अहवाल किंवा दोषींवर ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे चौकशीची गती आणि प्रशासनाची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
१८ मार्च रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयुक्त कार्तिक एम. यांनी या प्रकरणाची निष्पक्ष विभागीय चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आणि संबंधितांना नोटिसाही बजावण्यात आल्या. मात्र, त्यानंतर चौकशीबाबत कोणतीही अधिकृत प्रगती जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, घोटाळ्याशी संबंधित असल्याची चर्चा असलेल्या अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही ठोस शिस्तभंगाची कारवाई झालेली नसल्याने विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका अधिकाऱ्याची बदली वगळता इतरांवर कोणतीही निर्णायक कारवाई झालेली नसल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणात वादग्रस्त ३१ पीआयडी रद्द करण्यात आले असले, तरी ते मंजूर होण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे चौकशी केवळ कागदोपत्री राहणार का, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
यात भर म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेची सर्वसाधारण सभाच झालेली नसल्याने या महत्त्वाच्या विषयावर लोकप्रतिनिधींनाही प्रशासनाला जाब विचारण्याची संधी मिळालेली नाही.
पीआयडी घोटाळ्याप्रकरणी चौकशी कधी पूर्ण होणार, अंतिम अहवाल कधी सादर होणार आणि दोषींवर नेमकी काय कारवाई होणार, याकडे आता नागरिकांसह महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





