बेळगाव लाईव्ह : मुतगा येथील कंचवीर नगर परिसरातील सुमारे ३०० वर्षे जुन्या ऐतिहासिक विहिरीच्या पुनर्जीवन कार्याची राज्यभरात दखल घेतली जात असून, बुधवारी कर्नाटकचे माजी नगर विकास मंत्री बसवराज भैरती यांनी या विहिरीला भेट देत पुनर्जीवनाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार अनिल बेनके तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
प्यास फाउंडेशन आणि मुतगा ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून ही ऐतिहासिक विहीर पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या विहिरीची स्वच्छता, गाळ काढणे, परिसर सुशोभीकरण आणि जलस्रोताचे संवर्धन करण्याचे काम ग्रामस्थांच्या श्रमदानातून करण्यात आले. त्यामुळे आज ही विहीर पुन्हा एकदा गावाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक बनली आहे.
विहिरीची पाहणी केल्यानंतर माजी मंत्री बसवराज भैरती यांनी प्यास फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अशा ऐतिहासिक जलस्रोतांचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असून, समाजानेही अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या ऐतिहासिक विहिरीची ख्याती वाढत असून, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी यापूर्वीही या विहिरीला भेट देऊन पुनर्जीवनाच्या कार्याचे कौतुक केले आहे. स्थानिकांच्या श्रमदानातून साकारलेल्या या उपक्रमाकडे आदर्श जलसंवर्धनाच्या मॉडेल म्हणून पाहिले जात आहे.
यावेळी माजी आमदार अनिल बेनके, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, युवराज जाधव, मुर्गेंद्र गौड, वीरभद्र पुजारी, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष उमेश पुरी, माजी सैनिक सातेरी पाटील, भरमणी पाटील, गजानन पाटील, हेमंत पाटील, महावीर गुडाज, दीपक पुरी, परशराम केदार, सूरज पाटील, बाळाराम चौगुले, सुनील चौगुले तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मुतग्यातील ही ३०० वर्षे जुनी विहीर केवळ जलस्रोत नसून गावाच्या इतिहासाची आणि सांस्कृतिक परंपरेची साक्ष देणारा अमूल्य वारसा आहे. प्यास फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे या वारशाला नवजीवन मिळाले असून, भविष्यात अशाच ऐतिहासिक जलस्रोतांच्या संवर्धनासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





