बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कुख्यात गुन्हेगार विनायक उर्फ विलाक शंकर प्रधान (45) याच्याविरुद्ध गुंडा कायद्यांतर्गत मोठी कारवाई करण्यात आली असून त्याला प्रतिबंधात्मक नजरकैदेत ठेवत हिंडलगा कारागृहात पाठविण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हा 1999 पासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असून त्याच्यावर खंडणी, दरोडे, अपहरण, मारहाण, बेकायदेशीर जमाव आणि घातक शस्त्रांचा वापर अशा स्वरूपाचे एकूण 21 गुन्हे दाखल आहेत.
हे गुन्हे केवळ कर्नाटकापुरते मर्यादित नसून महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतही त्याच्याविरुद्ध प्रकरणे नोंद आहेत. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून काहींचा तपास सुरू आहे.
पोलीसांकडून यापूर्वीही त्याच्यावर रौडी शीट, प्रतिबंधात्मक कारवाई तसेच हद्दपार आदेश लागू करण्यात आले होते. मात्र, 2023 मधील हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून त्याने पुन्हा गुन्हेगारी सुरू ठेवली.

त्याच्या सततच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच साक्षीदारांना धमकावून न्यायप्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याचेही समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर सामान्य कायदेशीर उपाय अपुरे ठरत असल्याचे लक्षात घेऊन गुंडा कायद्यांतर्गत त्याच्यावर प्रतिबंधात्मक नजरकैद आदेश जारी करण्यात आला असून 16 एप्रिल रोजी त्याला हिंडलगा कारागृहात पाठविण्यात आले आहे.





