बेळगाव लाईव्ह :
बेळगाव शहरातील मध्यवर्ती हिंडलगा कारागृहात सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने मोठी कारवाई करत अचानक धाड टाकली. या कारवाईमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली.
कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) आलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही धाड पार पडली. तब्बल 52 पोलीस कर्मचाऱ्यांसह तसेच बेळगाव शहर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली.
या धाडीत कारागृहात सखोल तपासणी करण्यात आली. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या सर्चिंगदरम्यान कैद्यांच्या सेलची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन श्वान पथकांचीही मदत घेण्यात आली. तपासणीदरम्यान एक सिगारेट पाकीट तसेच जिम डंबेल्स आढळून आले.
धाडीदरम्यान कारागृहातील काही त्रुटींवरून एडीजीपी आलोक कुमार यांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच परतताना संबंधित अधिकाऱ्यांवर किरकोळ शिस्तभंग कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
गेल्या काही वर्षांपासून हिंडलगा कारागृहात विविध अवैध प्रकार वाढल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. कारागृहातून धमकीचे फोन, गुटखा अमली पदार्थांचा वापर, तसेच मोबाईलचा गैरवापर यांसारख्या गंभीर बाबींच्या पार्श्वभूमीवर ही धाड टाकण्यात आल्याचे समजते.
ही कारवाई कारागृहातील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि शिस्त प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.





