बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कॅम्प परिसरातील ब्रिगेडियर ए. बी. सय्यद हॉकी मैदानावर ऍस्ट्रो टर्फ उभारण्याच्या मागणीसाठी हॉकी बेळगाव संघटनेच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
बेळगावमध्ये हॉकी खेळाची समृद्ध परंपरा असून या खेळाला नवसंजीवनी देण्यासाठी आणि पूर्वीचा सुवर्णकाळ परत आणण्यासाठी मेजर सय्यद हॉकी मैदानाचे ऍस्ट्रो टर्फ मैदानात रूपांतर करावे, अशी मागणी हॉकी बेळगाव संघटनेने केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी सकाळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ सुदाम आंचलवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी दिल्लीतील क्रीडा मंत्रालयाकडे पाठवलेला आणि सध्या प्रलंबित असलेला प्रस्ताव, तसेच स्थानिक खासदार आणि आमदारांनी या प्रकल्पात अधिक रस घेण्याची गरज यांसारखे मुद्दे मांडण्यात आले. शहरातील हॉकीच्या विकासासाठी ऍस्ट्रो टर्फ मैदान अत्यावश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

चर्चेनंतर सीईओ सुदाम आंचलवार यांनी निवेदन स्वीकारून ऍस्ट्रो टर्फ मैदान उभारणीसाठी कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या भेटीत हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, हॉकी संघटनेचे सदस्य भाजप नेते किरण जाधव, सागर पाटील, विकास कलघटगी, दयानंद कारेकर, प्रकाश बेळगोजी आदी उपस्थित होते.





