बेळगाव लाईव्ह : प्रत्येक दिव्यांग व्यक्तीचा वार्षिक 2 लाख रुपयांचा आरोग्य विमा उतरवण्यात यावा या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन दिव्यांगांच्या बेळगाव जिल्हा संघटनेतर्फे आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये जमलेल्या बहुसंख्य दिव्यांगांनी संघटनेचे प्रमुख रावसाहेब देवरमणी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकानी निवेदनाचा स्वीकार करून मागण्यांचा सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असे आश्वासन दिले.
सरकारने दिव्यांगांच्या व्हीलचेअर देखभालीसाठी प्रतिमाह किमान 6 हजार रुपये द्यावेत. सर्व दिव्यांगाना बीपीएल कार्डची सुविधा द्यावी. कर्नाटकातील सर्व दिव्यांगांचा वार्षिक 2 लाख रुपयांचा आरोग्य विमा उतरवण्यात यावा, दिव्यांगाना सरकारच्या शक्ती योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यात प्रवास करण्यासाठी बस पास द्यावेत,
दिव्यांगांचे मासिक सहाय्य धन वेळेवर दिले जावे, राज्यात दिव्यांगांची संख्या 14 ते 15 लाख इतकी असल्यामुळे त्यांना सर्व स्थानिक संघ-संस्था, ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायतीसह लोकसभा आणि विधानसभेमध्ये राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी जागा राखीव ठेवली जावी वगैरे विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात यल्लाप्पा पालकर या दिव्यांगाने बेळगाव लाईव्हला आपल्या मागण्यांविषयी माहिती दिली.





