बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथे ड्रेनेज दुरुस्तीच्या कामासाठी करण्यात आलेली खुदाई नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. काम सुरू होऊन तब्बल आठ दिवस उलटून गेले तरी समस्या कायम असल्याने स्थानिक नागरिकांनी संबंधित कंत्राटदार आणि महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ड्रेनेज दुरुस्तीच्या कामामुळे परिसरातील पाणीपुरवठा आणि वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मात्र, काम पूर्ण करण्याबाबत कोणतीही गती दिसून येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित कंत्राटदार दखल घेत नसल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, या प्रकरणात संबंधित विभाग आणि कंत्राटदार एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना ‘चिरीमिरी’ दिल्यामुळे कंत्राटदारांवर कोणताही वचक राहिलेला नाही आणि त्यामुळेच ते नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहेत, असा गंभीर आरोप सुनील जाधव सह स्थानिकांनी केला आहे.
चव्हाट गल्लीतील रखडलेले ड्रेनेजचे काम आणि अन्य समस्या येत्या दोन दिवसांत मार्गी न लागल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून संबंधित विभाग आणि कंत्राटदारांना काम पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे.





