belgaum

संपूर्ण भारत उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात, हवामान विभागाचा गंभीर इशारा

0
188
Garmi Sumner unhala
 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : भारतात यंदाचा उन्हाळा सर्व विक्रम मोडीत काढत असून मे महिन्यात उष्णतेची लाट अधिक भयावह रूप धारण करणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये नागरिक उष्म्याने होरपळून निघत आहेत. एका ताज्या अहवालानुसार, जगातील १०० सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत ९५ शहरे भारतातील आहेत, यावरून परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट होत आहे.

देशाच्या बहुतांश भागांत तापमान सामान्यपेक्षा ५ अंशांनी अधिक नोंदवले जात आहे. रविवारी महाराष्ट्रातील अकोला येथे देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर प्रदेशातील बांदा येथे ४७.४ अंश, तर प्रयागराजमध्ये ४५.५ अंशांपर्यंत पारा पोहोचला आहे. देशाची राजधानी दिल्लीत गेल्या चार वर्षांतील उच्चांकी ४२.८ अंश तापमान नोंदवले गेले असून, राजस्थानमधील बारमेर ४५.७ अंशांसह होरपळत आहे. हरियाणा, पंजाब आणि जम्मूमध्येही रात्रीचे तापमान प्रचंड वाढल्याने नागरिकांची झोप उडाली आहे.

कर्नाटकमध्येही सूर्याचा तडाखा तीव्र झाला आहे. उत्तर कर्नाटकातील बिदर आणि कलबुर्गी येथे ४१.८ अंश तापमानाची नोंद झाली असून रायचूर आणि कोप्पळमध्येही पारा ४१ अंशांच्या पार गेला आहे. विशेष म्हणजे, बेळगावमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलने उष्णतेपासून बचावासाठी ‘सोलर फॅन’ असलेली टोपी परिधान केल्याचे चित्र समोर आले आहे, जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. केरळमध्ये अतिनील किरणांचा प्रभाव वाढल्याने मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी तातडीची बैठक घेऊन विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

 belgaum

भीषण उष्णतेमुळे देशभरात एअर कंडिशनर्स आणि कुलर्सचा वापर वाढल्याने विजेच्या मागणीने सर्व विक्रम मोडले आहेत. मे २०२४ मध्ये देशात एका दिवसाला २५० गिगावॅट विजेची मागणी नोंदवण्यात आली आहे, जी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. वाढत्या मागणीमुळे अनेक राज्यांमध्ये लोडशेडिंगचे संकटही उभे राहिले आहे.

वाढत्या उष्म्यामुळे निर्जलीकरण, हृदयविकार आणि उष्माघाताचा धोका वाढला आहे. सरकारने अनेक राज्यांतील सरकारी रुग्णालयांमध्ये ‘हीट वेव्ह’ वॉर्ड सुरू केले आहेत. नागरिकांनी दुपारच्या वेळी शारीरिक कष्टाची कामे टाळावीत, पांढरे सुती कपडे वापरावेत आणि लिंबू सरबत, ताक व ओआरएस यांसारख्या पेयांचे जास्तीत जास्त सेवन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मे महिन्यात पावसाची हजेरी लागली तरच तापमानात काही अंशी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.