belgaum

बेळगावमध्ये जूनअखेरपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही : मनपा आयुक्त

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना बेळगाव शहरात पाणीसंकट निर्माण होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. शहरात जून महिन्यापर्यंत पाण्याचा साठा पुरेसा असून, नागरिकांना टंचाई भासू दिली जाणार नाही, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त कार्तीक एम. यांनी दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आयुक्त कार्तीक एम. यांनी सांगितले की, शहराच्या ५८ वॉर्डांपैकी १० वॉर्डांमध्ये सध्या चोवीस तास पाणीपुरवठा केला जात आहे. उर्वरित ४८ वॉर्डांमध्ये दर ४ ते ५ दिवसांनी पाणी दिले जात असून, दररोज एकूण १०५ एमएलडी पाण्याचे वितरण राकसकोप, हिडकल आणि बसवणकोळ या मुख्य स्रोतांमधून सुरळीत सुरू आहे. जूनअखेरपर्यंत पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.

टंचाईग्रस्त भागांसाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवली आहे. शहरात सध्या ८४० सरकारी बोअरवेल्स कार्यान्वित आहेत. याशिवाय अतिरिक्त गरजेसाठी ३० खासगी बोअरवेल्स आणि १० खुल्या विहिरींची यादी तयार करण्यात आली असून, गरज पडल्यास महानगरपालिका त्या भाड्याने घेणार आहे.

 belgaum

तसेच, ज्या वॉर्डांमध्ये तांत्रिक कारणामुळे किंवा उंचीवरील भागामुळे पाणी पोहोचणार नाही, तिथे तात्काळ पाणी पोहोचवण्यासाठी महानगरपालिकेचे २८ टँकर्स सज्ज ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती आयुक्त कार्तीक एम. यांनी दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.