बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरभर रस्त्यांच्या कडेला आणि पदपथांवर वर्षानुवर्षे धुळखात उभी असलेली बेवारस व न वापरलेली वाहने ही गंभीर नागरी समस्या बनली आहे.
या वाहनांमुळे वाहतूक कोंडी वाढत असून रस्ते सुरक्षेलाही धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर अशी वाहने ओळखून हटवण्यासाठी समन्वित मोहीम राबवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केली आहे.
याबाबत दरेकर यांनी बेळगाव जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. शहरातील अनेक वाहनांची नोंदणी व विमा मुदत संपलेली असून ती दीर्घकाळापासून रस्त्यांवरच पडून आहेत. ही वाहने मौल्यवान सार्वजनिक जागा अडवून ठेवत असल्याने पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच या वाहनांमुळे केवळ वाहतूक कोंडी होत नाही, तर अपघाताचा धोका वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून शहरातील बेवारस वाहने हटवावीत, असे दरेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
अशा मोहिमेमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, रस्ते सुरक्षित होतील तसेच सार्वजनिक जागा मोकळ्या होऊन शहराच्या स्वच्छता व सौंदर्यातही भर पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.




