belgaum

माणुसकीचा हात, वृद्धाची 5 वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली पेन्शन..

0
808
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक–महाराष्ट्र सीमेलगतच्या हुक्केरी तालुक्यातील मोदगा गावातील 80 वर्षीय पुंडलिक यांच्या आयुष्यात यमकनमर्डी पोलिसांनी पुन्हा आशेचा किरण उजळवला आहे. गेल्या पाच वर्षांपासून बंद पडलेले त्यांचे वृद्धापकाळ पेन्शन पुन्हा सुरू करून देत पोलिसांनी केवळ कर्तव्यच नाही, तर माणुसकीचेही दर्शन घडवले.
पुंडलिक यांचे आयुष्य गेल्या काही वर्षांत संकटांनी व्यापले होते. एकुलत्या एक मुलाचे आजारपणामुळे निधन, पत्नीपासून विभक्त जीवन, आणि तीनही मुली लग्नानंतर दूरस्थ ठिकाणी स्थायिक—या सगळ्यांमुळे ते पूर्णपणे एकटे पडले. वाढते वय आणि काम करण्याची असमर्थता यामुळे त्यांच्यासमोर उपजीविकेचा मोठा प्रश्न उभा राहिला.
त्यातच आधार कार्ड अपडेट न झाल्यामुळे सरकारकडून मिळणारे पेन्शनही थांबले आणि त्यांची आर्थिक स्थिती आणखी बिकट झाली. अशा कठीण परिस्थितीत यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे सीपीआय जावेद मुशापूरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
त्यांच्या प्रयत्नांमुळे संबंधित अधिकाऱ्यांनी थेट पुंडलिक यांच्या घरी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि तहसीलदार कार्यालयाशी समन्वय साधत पेन्शन पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अखेर एप्रिल 2026 पासून पुंडलिक यांना त्यांचे वृद्धापकाळ पेन्शन पुन्हा मिळू लागले आहे.
या छोट्याशा पण अत्यंत महत्त्वाच्या मदतीमुळे पुंडलिक यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा जगण्याची उमेद निर्माण झाली आहे. समाजात पोलिसांविषयी सकारात्मक संदेश देणाऱ्या या कार्याबद्दल यमकनमर्डी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.