belgaum

काम आधी, साधने नंतर; बेळगाव महापालिकेचे उलटे नियोजन

0
211
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव परिसरात सुरू असलेल्या जनगणनेच्या कामामध्ये नियोजनाचा अभाव उघड झाल्याची चर्चा सुरू आहे. अनेक प्रगणकांनी आपल्या वाट्याला आलेल्या विभागातील घरांची जनगणना पूर्ण केली असली, तरी त्यांना आवश्यक साधनसामग्री अद्यापही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रगणकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


जनगणनेच्या कामासाठी अधिकृत किट देणे अपेक्षित असताना बेळगाव मनपाकडून प्रगणकांना केवळ एक मार्कर पेन, ओळखपत्राचा कागद आणि कन्नडमधील माहिती पुस्तिका देण्यात आली आहे. मराठी भाषेतील माहिती पुस्तिका मागितल्यावर त्या उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे बेळगाव तहसीलदार कार्यालयाकडून तालुक्यातील प्रगणकांसाठी मराठीमधील माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे.याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे दिलेल्या ओळखपत्रासाठी टॅगसुद्धा देण्यात आलेला नाही. याशिवाय फॉर्म, फाईल, पेन, कागद, पेन्सिल, खोडरबर, टोपी, पाण्याची बाटली, बॅग किंवा इतर कोणत्याही प्रकारची आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे प्रगणक सांगत आहेत.

 belgaum


परिणामी अनेक प्रगणकांना पेन, कागद व इतर साहित्य स्वतःच्या पैशातून खरेदी करून जनगणनेचे काम करावे लागले. प्रशासनाकडून आवश्यक साधनसामग्री न दिल्यामुळे प्रगणकांना कडक उन्हात घराघरात फिरून काम करताना अतिरिक्त त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.


दरम्यान, बाहेरील काही गावांमध्ये आणि इतर भागांमध्ये जनगणनेच्या कामासाठी आवश्यक किट आधीच वितरित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बेळगाव शहरातच किट का देण्यात आले नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.


विशेष म्हणजे काही प्रगणकांनी आपल्या क्षेत्रातील जनगणनेचे काम पूर्णही केले आहे. मात्र किट अजूनही मिळालेले नसल्यामुळे “जनगणना संपल्यानंतर किट देऊन काय उपयोग?” असा संतप्त प्रश्न प्रगणकांकडून विचारला जात आहे.

एकंदरित जनगणनेचे काम पूर्णत्वाकडे जात असताना साधनसामग्रीच्या अभावामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच बेळगाव महानगरपालिकेचे जनगणना नियोजन प्रमुख डॉ सिद्धू हुल्लोळीशयांनी तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी प्रगणकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.