बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथील ऐतिहासिक श्री महालक्ष्मी यात्रेसाठी सुरक्षा आणि नियोजनावर विशेष भर देण्यात आला आहे. लाखो भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन गावात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षेच्या दृष्टीने कडक नियमावली लागू करण्यात आली आहे.
उद्या, मंगळवार दि. २८ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी पोलिसांनी आणि यात्रा कमिटीने सुरक्षेचे सूक्ष्म नियोजन केले आहे. गावाकडे येणारे चारही प्रमुख रस्ते बॅरिकेड्स लावून वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. या ठिकाणी बाऊन्सर्स आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा खडा पहारा असणार आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि गर्दीच्या नियोजनासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यात्रा कमिटीने विशेष सूचना जारी करत महिला भाविकांना आवाहन केले आहे की, गर्दीचा फायदा घेऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोन्याचे किंवा महागडे दागिने परिधान करून येऊ नये. तसेच, स्थानिक ग्रामस्थांना वाहनांसाठी विशेष पास देण्यात आले असून, बाहेरून येणाऱ्या वाहनांना गावात प्रवेश नाकारण्यात आला आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यमनापूर बाजूला हिंडाल्कोच्या १७ एकर जागेत आणि शाहूनगर परिसरात रस्त्यालगतच्या शेतात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी या पार्किंग सुविधेचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजनानुसार, उद्या पहाटे ५ वाजून ४८ मिनिटांनी देवीचा विवाह सोहळा म्हणजेच अक्षतारोपण पार पडेल. त्यानंतर बुधवारी सकाळी ८:३० वाजता ५१ फूट उंच रथातून देवीची मिरवणूक काढली जाणार आहे. ६ मे पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यासाठी रथोत्सव मार्गावरील विजेच्या तारा आणि रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली आहेत. “प्रत्येक भाविकाला सुरक्षितपणे दर्शन घेता यावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.




