बेळगाव लाईव्ह : तब्बल ४३ वर्षांनंतर ऐतिहासिक सोहळा अनुभवण्यासाठी सज्ज झालेल्या कंग्राळी बुद्रुक गावात उद्या मंगळवारपासून श्री महालक्ष्मी यात्रेला प्रारंभ होत आहे. या प्रदीर्घ काळानंतर भरणाऱ्या यात्रेसाठी बेळगावसह सीमाभागातून लाखो भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर, गावात वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी यात्रा कमिटी व देवकी पंच कमिटीने गावाबाहेर प्रशस्त पार्किंगची व्यवस्था केली असून वाहतुकीचे कडेकोट नियोजन आखले आहे.
यात्रेच्या कालावधीत गावातील अंतर्गत रस्त्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी परगावच्या वाहनांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने आणि कमिटीने गावाच्या वेशीवर तीन प्रमुख ठिकाणी पार्किंग तळांची उभारणी केली आहे.
शाहूनगरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी रस्त्यालगतच्या शिवारात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, यात्रा कमिटीने भाविकांना एक विशेष आवाहन केले आहे की, गर्दीचा विचार करता भाविकांनी शाहूनगर मार्गापेक्षा राष्ट्रीय महामार्गाच्या (NH-4) सर्व्हिस रोडवरून ‘इंडाल’ (हिंडाल्को) मार्गे येण्याला प्राधान्य द्यावे.

हिंडाल्को कंपनीच्या १७ एकर अशा विस्तीर्ण जागेत सर्वात मोठा पार्किंग तळ उभारण्यात आला आहे. जिना बकुल शेजारील ही जागा अत्यंत प्रशस्त असून तेथून गावाकडे येणारा रस्ताही दर्जेदार आहे. त्यामुळे चारचाकी आणि दुचाकी वाहने घेऊन येणाऱ्या भक्तांनी हिंडाल्कोच्या या प्रशस्त पार्किंग सुविधेचा लाभ घेतल्यास त्यांना विनासायास मंदिरापर्यंत पोहोचता येईल.
कंग्राळी बुद्रुकच्या ग्रामस्थांनी आणि स्वयंसेवकांनी यात्रेच्या यशस्वीतेसाठी मोठी तयारी केली असून, भाविकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि पार्किंगसाठी निश्चित केलेल्या जागेचाच वापर करून सहकार्य करावे, अशी विनंती यात्रा कमिटी आणि देवकी पंच कमिटीने केली आहे. या नियोजनामुळे यात्रेकरूंना कोणत्याही त्रासाविना महालक्ष्मी देवीचे दर्शन घेता येणार आहे.




