बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील निसर्गरम्य कंग्राळी बुद्रुक या गावाला सध्या एका वेगळ्याच चैतन्याने ग्रासले आहे. तब्बल ४३ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेचा सुवर्णयोग जुळून आल्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५० मध्ये पहिली आणि त्यानंतर १९८३ मध्ये दुसरी यात्रा पार पडली होती. आता तब्बल चार दशकांनंतर मंगळवार दि. २८ एप्रिलपासून तिसऱ्या यात्रेचा शुभारंभ होत असल्याने ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी गावाने कंबर कसली असून, संपूर्ण बेळगाव तालुक्यात ही यात्रा ‘भव्य-दिव्य आणि ऐतिहासिक’ ठरेल अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. देवस्थान पंचकमिटी, यात्रा कमिटी आणि गावातील विविध युवक मंडळांनी या सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन केले असून, प्रत्येक गल्ली आणि घराघरात पाहुण्यांच्या स्वागताची तयारी पूर्णत्वास आली आहे.
या यात्रेचे सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे ५१ फूट उंच आणि अकरा अंकी महाकाय रथ. अंकलगी येथील निष्णात कारागीर लक्ष्मण बडीगेर यांनी अत्यंत कौशल्याने या रथाचे सुतारकाम केले असून, त्यावर थोर पुरुष आणि देवी-देवतांच्या आकर्षक प्रतिमा बसवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, रथाच्या रंगकामाची आणि सजावटीची जबाबदारी अनिल कडोलकर यांनी सांभाळली असून, ४३ वर्षांपूर्वी त्यांच्याच काकांनी या रथाला देखणे रूप दिले होते;
हा एक दुर्मिळ वारसा यंदाच्या यात्रेत पुन्हा एकदा उजळून निघाला आहे. यात्रोत्सवाच्या धार्मिक विधींची सुरुवात मंगळवार दि. २१ रोजी ‘इरडे घालणे’ आणि रथावर कळस चढविण्यापासून झाली आहे. सोमवार दि. २६ रोजी चव्हाण घराण्याच्या वतीने हळदीचा कार्यक्रम संपन्न होईल, त्यानंतर बाशिंग कारागीर जयराम चिखलकर यांच्या निवासापासून ढोल-ताशांच्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत देवीचे बाशिंग मंदिरात आणले जाणार आहे.
मंगळवार दि. २८ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजून ४८ मिनिटांनी अक्षतारोपण होऊन देवीचा विवाह सोहळा पार पडेल. त्यानंतर बुधवार दि. २९ रोजी सकाळी महालक्ष्मी देवी या अकरा अंकी रथात आरूढ होईल आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत रथोत्सवाला प्रारंभ होईल.
चव्हाट गल्लीमार्गे हा रथ दुपारी ४ वाजेपर्यंत विठ्ठल-रखुमाई मंदिराशेजारील गदगेच्या ठिकाणी पोहोचेल. देवी रथातून उतरून गदगेवर विराजमान झाल्यानंतर पारंपारिक पद्धतीने फळांचा बळी दिला जाईल आणि त्यानंतर घरोघरी नैवेद्य व महाप्रसादाच्या जेवणावळींना सुरुवात होईल. ६ मे पर्यंत हा सोहळा सुरू राहणार असून, गदगेच्या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी देवीची नित्य पूजा अर्चा केली जाणार आहे.

भाविकांच्या सोयीसाठी आणि आकर्षणासाठी यंदा गदगेच्या ठिकाणी तिरुपती बालाजी मंदिराची हुबेहूब आणि भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ४० बाय ४० व्यासाचा हा विस्तीर्ण मंडप भाविकांना तिरुपतीला आल्याचा साक्षात्कार घडवून देणारा आहे. दर्शनासाठी येणाऱ्या अलोट गर्दीचे नियोजन करण्यासाठी स्वतंत्र प्रवेश आणि निकास मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच उन्हाचा तडाखा लक्षात घेता पंखे, दर्शनासाठी स्क्रीन आणि पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था यात्रा कमिटीने केली आहे. बुधवारी होणारा रथोत्सव हा या यात्रेचा सर्वात मोठा दिवस असून, सीमाभागातील लाखो भाविक या शाही थाटाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. शेवटी, ६ मे रोजी सायंकाळी देवीचे सीमेकडे प्रस्थान होऊन या अविस्मरणीय आणि ऐतिहासिक यात्रेची सांगता होईल.




