बेळगाव लाईव्ह : हलगा गावातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हलगा ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल शिंदे यांची भेट घेऊन हलगा-बस्तवाड मार्गावरील ओंकार नगर क्रॉस परिसरात तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर्स) बसविण्याची मागणी केली.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव-हलगा सर्व्हिस रोडला लागून असलेल्या हलगा ते बस्तवाड रस्त्यावर दुचाकी व इतर वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार तसेच जनावरांच्या जीविताला सतत धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या मार्गावर तातडीने गतिरोधक उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
निवेदनात जैन स्मशानभूमीसमोर, सुभाऊ सागर नगर कॉर्नर, कन्नड प्राथमिक शाळेसमोर, लक्ष्मी गल्ली पश्चिम टोक, न्यू गल्ली आणि बसवण गल्ली परिसरात स्पीड ब्रेकर्स बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.

हलगा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने हा प्रश्न सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित असल्याचे सांगत संबंधित विभागाला तातडीने आदेश देण्याची विनंती केली. यावेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. आता या मागणीवर प्रशासन किती लवकर कार्यवाही करते, याकडे हलगा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




