बेळगाव लाईव्ह :गो-हत्त्या तात्काळ थांबवून कर्नाटक राज्यामध्ये अखिल वेदलक्षणा गोमातेची (संपूर्ण देशी गोवंश) विधिवत सेवा करण्याबरोबरच तिला संपूर्ण संरक्षण द्यावे. गाईला ‘राजमाता’ म्हणून घोषित करावे आणि तशी शिफारस केंद्राकडे करावी, अशी मागणी गोमाता सन्मान आहवान अभियानाच्या माध्यमातून आज मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
मुख्य संरक्षक वेदलक्षणा गोमाता आणि अध्यक्ष नंदी बाबा वृषभ यांच्या प्रेरणेतून संचालित गोमाता सन्मान आहवान अभियाना अंतर्गत आज सोमवारी सकाळी मोर्चाने उपरोक्त मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना धाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथून काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये साधूसंतांसह शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि गोभक्त स्त्री-पुरुष हातात गोहत्त्या बंदीचे, त्याचप्रमाणे गोमाते संबंधी जागृतीचे फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राधा नमन हरी गोविंद बोलो या सवाद्य नामस्मरणासह भारत माता की जय, गोमाता की जय, गोमाता -राष्ट्रमाता अशा घोषणा देत निघालेल्या या मोर्चामधील सजवलेल्या मिनी ट्रॅक्टर ट्रॉलीवरील गोमाता व भारत मातेचे तैलचित्र, तसेच अग्रभागी कार्यकर्त्यांसोबत जाणारी गाय-वासरे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.
सदर मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सांगता होऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून हे तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाकडे धाडण्याचे आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना एका मठाधीशानी सांगितले की, गोमाता सन्मान आहवान अभियान हे गोमातेला सुरक्षा आणि सेवा प्रदान करणे यासाठी समर्पित आहे. गाईला सुरक्षा आणि सेवा मिळण्याबरोबरच तिला संपूर्ण देशात सन्मान दिला जावा, यासाठी आम्ही समस्त गोभक्त आज संघटित झालो आहोत.

गाईला सेवा सुरक्षा आणि सन्मान मिळावा यासाठी मुख्यमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान आणि राज्यपालांना आम्ही प्रार्थना करत आहोत की, देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली असून देशाला लागलेला गो हत्त्येचा कलंक कायमचा पुसण्यात यावा. गाईला तिचा सन्मान दिला जावा, अशी आमची मागणी आहे. आणि एका पदाधिकाऱ्याने गेल्या सहा महिन्यापासून देशभरात गोमाता सन्मान आहवान अभियान सुरू असल्याची माहिती दिली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून 70 वर्षे पूर्ण झाली तरी गोहत्त्या थांबलेली नाही. गाईंची हत्या पूर्णपणे थांबावी आणि तसा कायदा अंमलात आणला जावा.
गाईला राष्ट्रमाता म्हणून घोषित केलं जावं, यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान मुख्यमंत्री आणि राज्यपालांना आम्ही गोभक्त आज निवेदन सादर करत आहोत, असे त्या पदाधिकाऱ्याने पुढे स्पष्ट केले.




