बेळगाव लाईव्ह: मंगळवार, 21 एप्रिल रोजी होणाऱ्या बेळगावच्या पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कंबर कसली असून, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शनिवारी रात्री स्वतः पायपीट करत मिरवणूक मार्गाची पाहणी केली आणि नेमक्या समस्या जाणून घेतल्या.
बेळगाव शहरातील शिवजयंती आणि गणेशोत्सवाच्या मिरवणुका भव्य स्वरूपाच्या असतात. लाखो शिवप्रेमी या मिरवणुकीत सहभागी होत असल्याने, शांततेत आणि सुरळीत मिरवणूक पार पाडण्यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त असतो. त्यानुसारच पोलीस आयुक्त बोरसे यांनी मिरवणुकीच्या दोन दिवस आधी मार्गाची पाहणी केली.
यावेळी मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मिरवणूक मार्गावर पायी चालत पाहणी करत समस्या जाणून घेतल्या.
शनिवारी रात्री नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट धर्मवीर संभाजी चौक परिसरापर्यंत पायपीट करत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
मिरवणूक मार्गावरील दोन्ही बाजूंच्या गल्ल्या, सर्विस रस्ते, लहान बोळ परिसरात रात्री पुरेशा प्रकाशासाठी फोकस लॅम्प बसवावेत, तसेच नागरी पोलीस आणि फिरते गस्त पथक तैनात करावेत, अशी मागणी करण्यात आली. नरगुंदकर भावे चौक (गणपत गल्ली, कलमाड रोड, शहापूर परिसर), हुतात्मा चौक (कडोलकर गल्ली, किर्लोस्कर रोड), धर्मवीर संभाजी महाराज चौक (शहापूर, अनगोळ भाग) आणि संयुक्त महाराष्ट्र चौक येथे लाऊडस्पीकरसह हेल्प डेस्क उभारावेत, अशीही मागणी करण्यात आली.

रामदेव गल्लीतील उघडी ड्रेनेज लाईन बंद करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून, मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पोलीस व्हॅन तैनात करण्यात येणार आहेत. धर्मवीर संभाजी चौक, वनिता विद्यालय आणि टिळक चौक परिसरातही पोलीस व्हॅन ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
संचयनी चौक ते कॅम्प तसेच वनिता विद्यालय ते युनियन जिमखाना या परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले असून, पार्किंग ठिकाणी प्रकाशयोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
तसेच मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजवण्याचे काम तातडीने हाती घ्यावे, विशेषतः शनी मंदिर सर्कल येथील खड्डे दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात आली.याशिवाय, मिरवणूक मार्गावरील विशेषतः मारुती गल्ली व इतर परिसरातील कॉम्प्लेक्स बंद ठेवावेत आणि उंच इमारतींवरून पोलीस बंदोबस्ताचे निरीक्षण करावे, अशीही सूचना करण्यात आली.





