belgaum

संरक्षण मंत्र्यांकडे बेळगाव विमानतळ व कॅन्टोन्मेंट मुद्दे

0
342
 belgaum


बेळगाव लाईव्ह :
बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन शहराशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न मांडले. विशेषतः बेळगाव विमानतळ आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाशी संबंधित मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.

शेट्टर यांनी सांगितले की, बेळगाव विमानतळासाठी स्वतंत्र टॅक्सीवे उभारण्यासाठी सुमारे 16 एकर एअर फोर्सची जमीन आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने समतुल्य जमीन देण्यास तयारी दर्शवली असली तरी एअर फोर्सकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे विमानतळाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी संरक्षण मंत्र्यांकडे केली.

तसेच, बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने (GLR S.No 324-1) सुमारे 6,045 चौरस फूट जागा नवीन फुलबाजारासाठी भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयावरही शेट्टर यांनी आक्षेप घेतला. लोकप्रतिनिधींशी कोणतीही चर्चा न करता घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.

 belgaum

अशोकनगर येथे आधीच शासकीय मान्यता असलेला फुलबाजार सुरू असून, नवीन बाजारासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची परवानगी आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, नव्या फुलबाजाराला दिलेली परवानगी रद्द करण्याचे आणि भविष्यात अशा निर्णयांपूर्वी खासदार व आमदारांचा सल्ला घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या सर्व मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.