बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील वंटमुरी कॉलनीत होणारा बालविवाह अक्का फडे (अक्का पथक) आणि पोलीस विभागाने वेळीच हाणून पाडत १७ वर्षांच्या मुलीची सुटका केल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.
गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, २० एप्रिल रोजी पेट्रोलिंगदरम्यान अक्का फडे (अक्का पथक) कर्मचाऱ्यांना एका घरासमोर उभारलेला लग्न मंडप संशयास्पद वाटला. चौकशी केल्यानंतर २१ एप्रिल रोजी त्या मुलीचा विवाह महाराष्ट्रातील पुणे येथील व्यक्तीसोबत लावण्याची तयारी सुरू असल्याचे उघड झाले.
मुलीचे आधार कार्ड आणि जन्म दाखला तपासल्यानंतर तिचे वय केवळ १७ वर्षे ४ महिने असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तत्काळ महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. महिला पोलीस, चाइल्ड हेल्पलाईन टीम तसेच माळमारुती पोलीस ठाण्याच्या ११२ पथकाच्या मदतीने कारवाई करून बालविवाह रोखण्यात आला.
सदर मुलीची सुटका करून तिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांविरोधात बेळगाव शहर महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीकडून बंदिस्त ठेवून छळ; महिला व दोन मुलांची सुटका
दरम्यान, दुसऱ्या घटनेत पतीकडून घरात बंदिस्त ठेवून मानसिक व शारीरिक छळ सहन करणाऱ्या एका महिलेला अक्का फडे (अक्का पथक) च्या पथकाने सुखरूप बाहेर काढले.
दिल्लीहून मिळालेल्या फोनवरून माहितीच्या आधारे महिला पोलीस ठाण्यामार्फत अक्का फडे (अक्का पथक) टीमला घटनास्थळी पाठवण्यात आले. पथकाने घराचा दरवाजा उघडून संबंधित महिला आणि तिच्या दोन मुलांची सुटका केली.
महिलेला आवश्यक वैद्यकीय उपचार आणि निवारा देण्यात आला असून तिच्या तक्रारीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे. तसेच महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांना विमानाने त्यांच्या मूळ गावी दिल्ली येथे पाठवण्यात आले आहे.




