बेळगाव लाईव्ह:महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून १ मे रोजी ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ, मुंबई’ या नव्या पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात येणार असून, यानिमित्त विशेष परिसंवाद आणि उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास सीमाभागातील पत्रकार तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
मराठी अस्मिता आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या पार्श्वभूमीवर उभी राहणारी ही नवी संघटना सीमाभागातील अपूर्ण प्रश्नांना नवी दिशा देण्याचा संकल्प करत आहे. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची प्रेरणा घेत, पत्रकारितेच्या माध्यमातून हा लढा अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमात ‘महाराष्ट्रधर्म आणि पत्रकारिता’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक गुणवंत पाटील हे या चर्चेत सहभागी होणार असून, विविध क्षेत्रातील मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.
तसेच म. ए. समितीचे युवा कार्यकर्ते सागर पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद प्रभू, ‘बेळगाव लाईव्ह’चे संपादक प्रकाश बेळगोजी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
शुक्रवार 1 मे रोजी पुणे भोसरी येथील फर्न रेसिडेन्सी सायं ५ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पत्रकार या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
नव्या संघटनेचे उद्दिष्टे स्पष्ट
नव्या पत्रकार संघटनेची गरज अधोरेखित करताना आयोजकांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत:
सीमाभागातील लढ्याला दिशा: स्थानिक प्रश्नांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणे
पत्रकारांचे संरक्षण: हल्ले, अन्याय आणि व्यावसायिक समस्यांविरोधात भक्कम भूमिका
सामाजिक बांधिलकी: पाणी, पायाभूत सुविधा आणि प्रशासनाशी संबंधित प्रश्नांवर आवाज
नव्या पिढीला मार्गदर्शन: डिजिटल युगात मूल्याधारित पत्रकारिता रुजवणे

दिग्गजांची उपस्थिती लाभणार
परिसंवादात News18 मराठीचे संपादक मंदार फणसे, दै. लोकमतचे संपादक संजय आवटे, महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे महेश म्हात्रे, पद्मश्री गिरीष प्रभुणे, मुक्तपीठचे तुळशीदास भोईटे आणि विचारवंत संजय सोनवणी यांची उपस्थिती लाभणार आहे.
आमंत्रणाचे आवाहन
या ऐतिहासिक उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित राहून मार्गदर्शन करावे, असे आवाहन पत्रकार गोविंद घोळवे आणि गोविंद वाकडे यांनी केले आहे. आपल्या उपस्थितीमुळे या नव्या चळवळीला बळ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.




