बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत रविवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीच्या कठड्याची भिंत अचानक कोसळून सदर दुर्घटना घडली आहे. पोहून झाल्यावर मुले कचऱ्याच्या भिंतीवर बसली होती भिंत कोसळल्याने मुलेही विहिरीत पडली गेली त्यामुळे मुलांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
मृत मुलांची नावे शिवम परशुराम सुंडीकर (वय 7) रा. जेड गल्ली शहापूर आणि परशुराम राजू निलजकर (वय 11) शिवाजी नगर परिसरातील रहिवासी होते.
दोन्ही मुले रविवारी सुट्टीच्या दिवशी पोहण्यासाठी कपिलेश्वर हौदात गेली होती.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्यांचा आक्रोश पाहून वातावरण भारावून गेले होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व एसडीआरएफ पथकाने घटनास्थळी धाव घेत शोध व बचावकार्य सुरू केले. मात्र अथक प्रयत्नांनंतरही दोन्ही मुलांना वाचवण्यात अपयश आले.
महापालिकांच्या अधिकाऱ्यानी देखील घटनास्थळी धाव घेतली असून एका मुलाचा मृतदेह मिळाला आहे आणि दुसऱ्याचा मृतदेहाचा शोध सुरू आहे दरम्यान विहिरीच्या पाण्यात कॅमेऱ्या टाकून देखील आणखी तिसरा कोणी बुडाला आहे का याचा देखील शोध घेतला जात आहे आणि विहिरीचे पाणी उपसायला देखील मीटर लावून सुरुवात केली आहे.
ही घटना खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.





