belgaum

राजारामबापू पाटील ललित कला अकादमीचे राष्ट्रीय पुरस्कार २०२६ जाहीर

0
155
 belgaum

बेळगाव लाईव्ह :
राज्याचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राजारामबापू पाटील ललित कला अकादमी (महाराष्ट्र राज्य) तर्फे दिले जाणारे ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान २०२६’ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अकादमीचे निमंत्रक कवी प्रा. प्रदीप पाटील आणि ज्येष्ठ सदस्य प्राचार्य आर. डी. सावंत यांनी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानासाठी प्रसिद्ध लेखक, अनुवादक व अभ्यासक डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना ‘जीवनगौरव सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये व सन्मानचिन्ह असे आहे.

‘राष्ट्रीय ललित कला सन्मान’ पुरस्कार मराठी कविता व ललित लेखनासाठी कवयित्री सिसिलिया कार्व्हलो (वसई), दक्षिण भारतातील मराठी भाषेच्या अभ्यासपूर्ण कार्यासाठी संशोधक डॉ. विवेकानंद गोपाल (तंजावर), तसेच कथासाहित्यातील योगदानासाठी प्रा. डॉ. रणधीर शिंदे (शिवाजी विद्यापीठ) यांना जाहीर झाला आहे. या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे आहे.

 belgaum

याशिवाय ‘विशेष सन्मान’ लेखन व मराठी भाषेच्या प्रसारासाठी अनंत कदम (होळसमुद्र, कर्नाटक) यांना देण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे आहे. या सर्व पुरस्कारांची निवड प्रसिद्ध विचारवंत व संत साहित्य अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली.

हे सर्व पुरस्कार १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता बेळगाव येथील श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार आहेत. या वेळी आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कथाकार डॉ. सुरेंद्र दरेकर (अहिल्यानगर) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राजारामबापू पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा राष्ट्रीय पातळीवर प्रसार करण्याच्या उद्देशाने अकादमीकडून दरवर्षी विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सन्मान केला जातो. यंदाचे हे पुरस्कार वितरणाचे चौथे वर्ष असून, यापूर्वी पुणे, बडोदा आणि गोवा येथे समारंभ पार पडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.