belgaum

किदवई कर्करोग रुग्णालय प्रकल्पाला गती;

0
190
Kidawai hospital bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : उत्तर कर्नाटकातील आरोग्यसेवेसाठी महत्त्वाची दिलासादायक घडामोड घडली असून, प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या किदवई कर्करोग रुग्णालय प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल (जिल्हा रुग्णालय) आवारात या प्रकल्पासाठी सुमारे 1.3 एकर जागा निश्चित करण्यात आली असून, पूर्वतयारीची कामे सुरू झाली आहेत.

राज्य सरकारने 2022 मध्ये या रुग्णालयास मंजुरी दिली होती. मात्र योग्य जागेच्या अभावामुळे प्रकल्प रखडला होता. आता बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्था (बीम्स) अंतर्गत जिल्हा रुग्णालय परिसरात जागा निश्चित झाल्याने प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात दाखल झाला आहे. संबंधित ठिकाणावरील जुन्या इमारती पाडून जागा मोकळी करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इरन्ना पल्लेद यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “किदवईतर्फे हे कर्करोग रुग्णालय उभारले जाणार असून, बीम्सकडून आवश्यक जागा आणि पूरक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.”

 belgaum

सुमारे 50 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी सुरुवातीला वडगाव येथे जागा प्रस्तावित होती. मात्र कर्करोग रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या विविध वैद्यकीय विभागांची उपलब्धता लक्षात घेता, प्रकल्प विद्यमान वैद्यकीय परिसंस्थेत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, 2025 मध्ये सुवर्ण विधान सौध येथे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा विकास आढावा बैठकीत हा प्रकल्प जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बीम्स परिसरातील नर्सिंग महाविद्यालयाची जुनी इमारत जमीनदोस्त करून त्या जागेवर रुग्णालय उभारले जाणार आहे.

योग्य जागेच्या अभावामुळे सुमारे चार वर्षे प्रकल्प रखडला होता. मात्र आता जागा निश्चिती व पूर्वतयारीची कामे सुरू झाल्याने प्रकल्प मार्गी लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

या किदवई कर्करोग रुग्णालयामुळे बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर कर्नाटकातील रुग्णांना निदान व उपचारासाठी मोठा दिलासा मिळणार असून, प्रादेशिक आरोग्यसेवेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.