belgaum

जनगणनेच्या कामात दिरंगाई नको;मनपा आयुक्तांचे निर्देश

0
201
City corporation logo
City corporation logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील जनगणनेचे काम राष्ट्रीय कर्तव्याचा भाग असून त्यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत महानगरपालिका आयुक्त कार्तीक एम. यांनी जनगणना कर्मचारी आणि पर्यवेक्षकांना सुनावले आहे. हे काम दिलेल्या मुदतीतच पूर्ण करण्याचे बंधनकारक आदेश त्यांनी दिले आहेत.

महानगरपालिका कार्यालयात जनगणनेच्या कामाचा आढावा घेताना आयुक्त कार्तीक एम. यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक कर्मचाऱ्याने दिवसभरात केलेल्या नोंदींचा अहवाल रोज सायंकाळी वरिष्ठांकडे देणे अनिवार्य आहे. कामात विनाकारण विलंब करणाऱ्या किंवा टाळाटाळ करणाऱ्यांवर थेट प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. ज्या वॉर्डांमध्ये कामाचा वेग कमी आहे, तिथल्या तांत्रिक अडचणी तातडीने सोडवून सर्वेक्षण गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान, हे गुंतागुंतीचे काम अचूकपणे आणि वेळेपूर्वी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची महानगरपालिका दखल घेणार आहे. अशा कर्मचाऱ्यांचा गौरव करून त्यांना प्रशस्तीपत्र दिले जाईल, असेही आयुक्तांनी जाहीर केले.

 belgaum

या बैठकीला उपायुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी, उदयकुमार बी.टी. यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जनगणनेच्या वेळी नागरिकांनी सहकार्य करावे आणि प्रगणकांना खरी माहिती द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

बेळगावमध्ये जनगणनेचा श्रीगणेशा; ८३१ ब्लॉक्समध्ये होणार घराघरांचे सर्वेक्षण
पुढील १५ दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे मनपाचे उद्दिष्ट

: केंद्र सरकारच्या आदेशानुसार बेळगाव महानगरपालिका क्षेत्रात महत्त्वपूर्ण जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी ही जनगणना अत्यंत मोलाची असून, पुढील १५ दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त कार्तीक एम. यांनी दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आयुक्त कार्तीक एम. यांनी सांगितले की, महानगरपालिका व्याप्तीमध्ये जनगणनेसाठी एकूण ८३१ ब्लॉक्स निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक ब्लॉकमध्ये सुमारे १५० ते २०० घरांची नोंदणी केली जाणार आहे. या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि कामाचा वेग राखण्यासाठी ७ चार्ज अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या शहरात घरांची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महानगरपालिकेने नियुक्त केलेले कर्मचारी प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन माहिती संकलित करत आहेत. ही प्रक्रिया येत्या दोन आठवड्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शहराच्या भविष्यकालीन योजनांसाठी ही माहिती आधार ठरणार असल्याने नागरिकांनी जनगणना कर्मचाऱ्यांना खरी आणि अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त कार्तीक एम. यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.