बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील आरपीडी कॉलेज रोडवरील फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर महानगरपालिकेने मंगळवारी सायंकाळी धडक कारवाई केली. पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्या आणि बांधकामे हटवून प्रशासनाने अतिक्रमणधारकांना चांगलाच दणका दिला आहे.
बेळगाव महानगरपालिकेतर्फे मंगळवारी सायंकाळी आरपीडी कॉलेज रस्त्यावरील फुटपाथवर व्यावसायिकांनी केलेले अवैध अतिक्रमण हटवण्यासाठी मोठी मोहीम राबवण्यात आली.
या कारवाई दरम्यान फुटपाथवरील अनधिकृत बांधकामे, स्टॉल्स आणि पादचाऱ्यांच्या वाहतुकीस अडथळा ठरणारे साहित्य जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आले.
पादचाऱ्यांना रस्ता मोकळा करून देणे आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवणे या उद्देशाने महानगरपालिकेने हे कठोर पाऊल उचलले आहे. कारवाई दरम्यान काही व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला, मात्र महानगरपालिका अधिकाऱ्यांनी त्यांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देऊन कडक इशारा दिला. आगामी काळात शहराच्या इतर भागांतही अशाच प्रकारची मोहीम राबवण्यात येणार आहे.
जनतेच्या तक्रारींची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली असून यासाठी महानगरपालिकेने विशेष समिती स्थापन केली आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम यांनी दिली.
या मोहिमेत महानगरपालिका अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.




