बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि खानापूर तालुक्यात हजारो कोटी रुपयांचा बॉक्साईट आणि लेटराइट खनिजाचा अवैध उपसा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी राजकुमार टोपण्णावर आणि सुजित मुळगुंद यांनी बेळगाव लोकायुक्त एसपींकडे पुराव्यासह सविस्तर तक्रार दाखल केली आहे.
बेळगावमधील बेलगुंदी गावातील सर्व्हे नंबर २८५ या सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे खाणकाम सुरू असून यात सर्व नियमांचे उल्लंघन झाले आहे. या तक्रारीत खाण आणि भूविज्ञान विभागाचे संचालक आणि गोवा प्रादेशिक कार्यालयातील भारतीय खाण ब्युरोच्या अधिकाऱ्यांची नावे प्रामुख्याने घेण्यात आली आहेत. या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि संगनमतामुळेच हे अफाट अवैध उत्खनन सुरू असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
या घोटाळ्यात ‘मालिनी रिसोर्सेस’ ही कंपनी मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात आले आहे. महसूल, वन विभाग आणि पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी नसताना या कंपनीकडून खनिजाची अवैध वाहतूक आणि विक्री सुरू आहे.

मंजूर मर्यादेपेक्षा कितीतरी पट अधिक उत्खनन करून निसर्गाची मोठी हानी केली जात असल्याचे राजकुमार टोपण्णावर आणि सुजित मुळगुंद यांनी म्हटले आहे.
हे रॅकेट केवळ कर्नाटकपुरते मर्यादित नसून महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान चालणारे एक मोठे आंतरराज्य जाळे आहे. महाराष्ट्रातील चंदगड तहसीलदार हे सावली गावात साठवलेल्या खनिजाच्या मूळ स्रोताची कोणतीही पडताळणी न करता वाहतूक परवाने देत आहेत, ज्यामुळे या अवैध खनिजाला कायदेशीर स्वरूप मिळत असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
अवैध खाणकामामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, भूजल पातळीत घट आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गदा आली आहे. या खाण माफियांच्या कृत्यामुळे सरकारचा हजारो कोटींचा महसूल बुडाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अवैध खाणकाम तातडीने थांबवावे, अशी मागणी लोकायुक्त प्रशासनाकडे करण्यात आली आहे.




