बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून, वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत.
बेळगाव विमानतळावर आज ३७.२ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली असून, उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते, तर दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका इतका असतो की शहरातील मुख्य रस्ते ओस पडू लागले आहेत. वाढत्या उष्णतेसोबतच घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले असून, उष्म्यापासून बचाव करण्यासाठी टोपी, रुमाल आणि सनग्लासेसचा वापर वाढला आहे. घामावाटे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने आरोग्याच्या तक्रारीही उद्भवत आहेत.

उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी नागरिक आता शीतपेये, शहाळी, ऊसाचा रस आणि कलिंगड यांसारख्या फळांकडे वळले आहेत. रसवंती गृहे आणि आईस्क्रीम पार्लर्समध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि सुती कपड्यांचा वापर करावा, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.





