belgaum

सीमाभागातील ‘मुखपत्र’ की ‘ चूकपत्र’?

0
2951
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावसह सीमाभागाचे ‘मुखपत्र’ म्हणून आपलीच आपण टिमकी वाजवणाऱ्या एका दैनिकाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत मोठी चूक केली आहे. या प्रकारामुळे काही संघटनांच्या भावना दुखावल्या असून, कार्यकर्त्यांनी संबंधित वृत्तपत्र कार्यालयाला घेराव घालून आपला निषेध नोंदवला.

आजच्या अंकात पहिल्या पानावर प्रकाशित झालेल्या शासकीय जाहिरातीत महामानवाला ‘अभिवादन’ करण्याऐवजी चक्क ‘श्रद्धांजली’ असा शब्द वापरण्यात आला. मराठी व्याकरण आणि सामाजिक संकेतानुसार, ‘श्रद्धांजली’ हा शब्द व्यक्तीच्या निधनानंतर अर्पण केली जाते, तर थोर राष्ट्रपुरुषांच्या जयंतीदिनी त्यांना ‘अभिवादन’ किंवा ‘वंदन’ प्रणाम नमन करणे अपेक्षित असते. शब्दांच्या या निवडीवरून हे ‘मुखपत्र’ आहे की चूकपत्र’, अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी संबंधित वृत्तपत्राच्या भूमिकेवर ताशेरे ओढले.

या घटनेचे पडसाद उमटताच विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वृत्तपत्र कार्यालयासमोर निदर्शने केली. “बहुजन समाजाच्या महान नेत्यांबाबत इतका अनादर का? प्रत्येक वेळी अशा गंभीर चुका करून केवळ माफी मागून वेळ मारून नेण्याचे प्रकार आता समर्थनीय नाहीत,” अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. वृत्तपत्र चालवताना किमान भाषिक अचूकता आणि सामाजिक भान राखणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

 belgaum

कार्यकर्त्यांचा वाढता रोष पाहून वृत्तपत्र व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली आहे. उद्याच्या अंकात याबाबत अधिकृत स्पष्टीकरण आणि माफीनामा प्रसिद्ध करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, सीमाभागातील जनतेचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या या दैनिकाकडून वारंवार होणाऱ्या अशा ‘तांत्रिक’ चुकांमुळे अशा बेजबाबदारीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मराठी भाषेत शब्दांना अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वाचे अर्थ असतात. ‘श्रद्धांजली’ हा शब्द प्रामुख्याने एखाद्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांच्या निधनानंतर आदरांजली वाहण्यासाठी वापरला जातो. याउलट, जयंती हा एक ‘जन्मसोहळा’ असतो. महापुरुषांच्या विचारांचे आणि कार्याचे ‘आगमन’ साजरे करण्याच्या या आनंदाच्या दिवशी मृत्यूशी संबंधित शब्द वापरणे हे केवळ भाषिक दृष्ट्या अशुद्धच नाही, तर अत्यंत विसंगत आहे. श्रद्धांजली हा शब्द ‘निरोप’ देण्याच्या भावनेशी निगडित आहे, तर जयंती त्यांच्या स्मृतींना उजाळा देत ‘अभिवादन’ करण्याची असते. अशा वेळी चुकीच्या शब्दाची निवड करणे, हा त्या थोर व्यक्तीच्या स्मृतींचा अनादर मानला जाऊ शकतो. एक सुसंस्कृत आणि जाणकार वृत्तपत्र म्हणून योग्य ठिकाणी योग्य शब्दांचा वापर करणे, हेच आपल्या भाषेचे आणि त्या महामानवाच्या कार्याचे खरे संवर्धन ठरेल.

याच दैनिकाकडून पूर्वी याच पद्धतीची चूक झाली होती पण त्यातून शहाणपणा न घेता परत एकदा तीच चूक जर ते करत असतील तर चूक न म्हणता जाणून बुजून केलेला प्रमाद आहे असे म्हणावे लागेल.सदर पत्राच्या एकंदर कार्यपद्धतीवर लक्ष देता बहुजन समाजातील महापुरुषांची ज्यांनी ज्यांनी महापुरुषांचा अवमान केला त्यांच्या बाबतीत ममत्त्वाचे धोरण दिसून येते प्रसंगी बहुजनांचा विरोध डावलून बेळगावात त्यांचे सत्कारही केले गेले त्याच बरोबर बेळगावातील सर्व बहुजनांच्या संस्था आपल्या ‘अंकुशा’ खाली कशा येतील याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा बहुजन समाजाला ‘मरगळ’आलेली दिसते त्यावेळी तुम्हाला प्रकाशात आणतो अशी लालूच दाखवून आपला अमल चढवला जातो. ज्या ज्यावेळी सदर पत्राला कोण विरोध करेल त्याला अप्रकाशित करण्याचे धोरण अवलंबून त्याचे नाव वगळणे, फोटो कापणे, प्रतिस्पर्धी माध्यमांवर कुरघोड्या करण्यासाठी पैशाचा गैरवापर करून यंत्रणा वापरणे अशा पद्धतीचे कृत्य केले जाते. समितीच्याच एका माजी आमदाराचा या वर्तमानपत्राने या पद्धतीने गेली कित्येक वर्ष छळवाद केला आहे. एक माजी स्वर्गीय लोकप्रतिनिधी आणि या दैनिकाचा वाद अजूनही सीमाभागातील लोक विसरले नाहीत. ज्यानी आपल्याला मोठे केले त्याच बहुजन समाजाच्या डोक्यात वरवंटा घालण्याचे काम आपल्या या कृत्याने या वर्तमानपत्राने केले आहे.यांनी अनुल्लेख करूनही एक लोकप्रतिनिधी एकदा दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा निवडून आला आणि यांनी पाठिंबा देऊन उभा केलेले अनेक उमेदवार अनेकदा चिल्लर मते घेऊन तोंडावर आपटले आहे.

बहुजनांच्या सर्व संस्थावर आपले प्यादे गेल्या नंतर बहुजनांच्या संस्था मोडीत काढण्याचे काम यांच्याकडून होत राहते.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगात आपल्या बुद्धिमतेने झेंडा रोवणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या कुपमंडुक पत्राचे काय घोडे मारले हे समजून येत नाही, आज त्यांच्या जयंतीच्या दिवशीच आपल्या हिन प्रवृत्तीचे दर्शन या प्रतिगामी विचारसरणीच्या पत्राने दाखवून दिले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.