बेळगाव लाईव्ह : कॅम्प परिसरातील ऐतिहासिक सेंट मेरी चर्च येथे आज (१५ एप्रिल रोजी) १५७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १५ एप्रिल १८६९ रोजी स्थापन झालेल्या या चर्चने शहराच्या समृद्ध इतिहासाचे जतन करत आजही आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे.
बेळगाव शहरातील ऐतिहासिक वास्तूंमध्ये सेंट मेरी चर्चचे विशेष स्थान आहे.
१८०० च्या सुरुवातीच्या काळात ब्रिटिश सैन्य बेळगाव किल्ल्यात तळ ठोकून होते. त्यावेळी सैनिकांसाठी ‘ऑल सेंट्स ख्राइस्ट चर्च चॅपल’ उभारण्यात आले होते. नंतर गोव्याजवळ पोर्तुगीज नौदलाची हालचाल वाढल्यानंतर ब्रिटिशांनी बेळगावमध्ये आपली उपस्थिती मजबूत करत पूर्ण गॅरिसन उभारले आणि सैनिक व अधिकाऱ्यांच्या धार्मिक गरजांसाठी १५ एप्रिल १८६९ रोजी या चर्चचे बांधकाम व अभिषेक करण्यात आला.
स्वातंत्र्यानंतर या चर्चला ‘चर्च ऑफ इंग्लंड’ म्हणून ओळख मिळाली आणि आजही त्याच नावाने ते प्रसिद्ध आहे.
गॉथिक स्थापत्यशैलीत उभारण्यात आलेल्या या चर्चमध्ये गोकाक येथील गुलाबी दगड तसेच दांडेली येथील सागवान व रोजवुड लाकूड वापरण्यात आले आहे. भव्य खांब, रंगीत काचेची खिडकी (stained glass), संगमरवरी वेदी आणि टाईल्सचे छप्पर यामुळे चर्चमध्ये शांतता व प्रसन्नतेचे वातावरण अनुभवायला मिळते.

काळाच्या ओघात या इमारतीवर झीज झाल्याने नोव्हेंबर २०२४ मध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मूळ स्वरूप कायम ठेवत आधुनिक गरजांनुसार नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे एक वर्ष चाललेल्या या कामासाठी तब्बल १ कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा निधी स्थानिक समुदायातून उभारण्यात आला असून देशभरातील कारागिरांनी या कामात सहभाग घेतला.
नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर २९ ऑक्टोबर २०२५ रोजी चर्च पुन्हा सर्वांसाठी खुले करण्यात आले. दर रविवारी सकाळी ८.३० वाजता येथे प्रार्थना सभा घेतली जाते.
आज सेंट मेरी चर्च आपल्या ऐतिहासिक वारशासह नव्या रूपात उभे असून, पुढील पिढ्यांसाठी बेळगाव शहराची ओळख जपणारी अमूल्य वास्तू ठरत आहे.





