Home बातम्या “शिवरायांनी स्वराज्य दिलं, बसवेश्वरांनी मानवतेचा संदेश दिला” – गुणवंत पाटील
belgaum

“शिवरायांनी स्वराज्य दिलं, बसवेश्वरांनी मानवतेचा संदेश दिला” – गुणवंत पाटील

0
“शिवरायांनी स्वराज्य दिलं, बसवेश्वरांनी मानवतेचा संदेश दिला” – गुणवंत पाटील
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह :
“छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमान आणि स्वराज्याची शिकवण दिली, तर जगद्ज्योती बसवेश्वरांनी भक्तीतून मानवतेचा संदेश दिला,” असे प्रतिपादन मराठी साहित्यिक गुणवंत पाटील यांनी बेळगाव बार असोसिएशनतर्फे आयोजित श्री शिव-बसव जयंती कार्यक्रमात केले. न्याय, शौर्य आणि मानवतेच्या विचारांचा संगम अधोरेखित करत त्यांनी वकिली व्यवसायाच्या भूमिकेलाही ऐतिहासिक संदर्भात अधोरेखित केले.


बेळगाव बार असोसिएशन अर्थात वकील संघटनेतर्फे सोमवारी सकाळी श्री शिव-बसव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या कार्यक्रमात मुख्य वक्ते या नात्याने ते बोलत होते.

बेळगाव न्यायालय आवारातील वकील समुदाय भवनातील ॲड. डी. बी. दिक्षित सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव 8 व्या जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीश तेजश्री आर. यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी व्यासपीठावर बार असोसिएशनचे माजी प्रभारी अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपमहापौर ॲड. हनुमंत कोंगाली, माजी उपाध्यक्ष ॲड. बसवराज मुगळी, ॲड. राम शेट्टी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक राजेंद्र मुतगेकर आणि मराठी साहित्यिक गुणवंत पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात असोसिएशनचे माजी सचिव ॲड. वाय. के. दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रस्ताविक करून केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्ज्योती संत बसवेश्वर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

पुढे गुणवंत पाटील म्हणाले की
“छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तीच्या जोरावर स्वराज्य उभे करत स्वाभिमानाची शिकवण दिली, तर बसवेश्वरांनी भक्ती आणि विचारांच्या माध्यमातून मानवतेचा आणि समतेचा संदेश दिला,” असे गुणवंत पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, बसवेश्वरांचे शरण साहित्य आणि वचन साहित्य सर्व भाषांमध्ये भाषांतरित होऊन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तसेच शिवरायांचा शौर्य इतिहास घराघरात पोहोचणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इतिहासाचा संदर्भ देताना त्यांनी शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाचा उल्लेख करत वकिलांच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला. “प्रतापगडाच्या युद्धात जसे शिवरायांचे युद्धकौशल्य महत्त्वाचे होते, तसेच गोविंदपंत बोकील यांसारख्या वकिलांची रणनीतीही निर्णायक ठरली होती,” असे ते म्हणाले.

“आपली बाजू प्रभावीपणे मांडणे हेच वकिलांचे खरे कौशल्य आहे. जे वकील आपल्या अशिलाच्या हिताचा विचार करतात तेच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ ठरतात. राज्य तलवारीने जिंकता येते, पण न्यायाने टिकवता येते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्योजक राजेंद्र मुतगेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक दर्जाचे योद्धे होते आणि त्यांनी महिलांचा नेहमी सन्मान केला, असे सांगत आपले विचार मांडले.
कार्यक्रमास बेळगाव बार असोसिएशनचे सदस्य, शिव संत संजय मोरे, वास्तू विशारद एम वाय घाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.