बेळगाव लाईव्ह : निधन पावलेल्या एका वृद्ध महिलेवर तिच्या पोटच्या मुलांनीच अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्काराचे सोपस्कार पूर्ण केल्याची माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना आज बेळगाव शहरात घडली.
याबाबतची माहिती अशी की, दोन कर्ती मुले असूनही शाहूनगर बेळगाव येथील घरी एकट्याच राहणाऱ्या अंजना धमुने या वृद्ध महिलेचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी शेजाऱ्यांनी अंजना यांच्या दोन्ही मुलांना दिली.
तेंव्हा आईचे मोल विसरलेल्या, माणुसकी हरवलेल्या त्या मुलांनी आपल्या आईवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिले. तसेच शेजाऱ्यांना अंत्यसंस्कार वगैरे तुमचं तुम्हीच बघा, असा निर्लज्ज सल्ला दिला. त्यामुळे नेमके काय करायचे? या गोंधळात पडलेल्या शेजाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक शंकर पाटील यांच्याशी संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली.

तेंव्हा नगरसेवक पाटील आणि त्यांचे सहकारी समाजसेवक गंगाधर पाटील तात्काळ शाहूनगर येथे दाखल झाले. तसेच शेववाहीकेतून अंजना धमुने यांचा मृतदेह सदाशिवनगर स्मशान भूमीमध्ये नेऊन त्यांनी स्वतःच्या हाताने त्यांच्यावर अग्निसंस्कार केले.
नगरसेवक शंकर पाटील व समाजसेवक गंगाधर पाटील यांच्या आजच्या या माणुसकीच्या कृतीतून त्यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली.




