बेळगाव लाईव्ह : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून भाई एस एम जोशी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे सीमा भागाशी जिव्हाळ्याचे संबध आहेत त्यानंतर राजकीय भूमिका अनेक सरकारे बदलली तरी ठाकरे कुटुंबीय बेळगावच्या सीमा प्रश्नाशी बांधील राहिले तोच वास पुढे घेऊन उद्धव ठाकरे यांनी एकूणच सीमा प्रश्नाच्या लढ्यात नेहमीच आक्रमक राहिले यासाठी ठाकरे कुटुंबाच्या बाबतीत बेळगावात आपुलकीची भावना आहे. त्याच कुटुंबातील उद्धव आणि राज ठाकरे यांचे काल मनोमिलन झाले दोघे भाऊ १८ वर्षांनी एकत्र भेटले..
मराठी माणसाला काल शनिवार दि. 5 जुलै 2025 रोजी एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला.. गेल्या 20 वर्षांपासून जे घडत नव्हतं ते काल घडलं. हिंदी सक्तीच्या विरोधात व मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकाच मंचावर आले. ते एकाच मंचावर आले हे काही आकस्मित घडलं असं नाही तर गेल्या महिन्यात दीड महिन्यापासून ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरशयुती करणार किंवा एकत्रित येणार अशीही चर्चा होती. थोडक्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच याची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. ठाकरे बंधू एकत्र येण्याचे महत्त्व महाराष्ट्र आणि मुंबईकरता मर्यादित नसून संपूर्ण देशाच्या राजकारणातही याचे पडसाद उमटतील हे मात्र नक्की आहे.
हे दोन्ही ठाकरे कुटुंबांचे वैयक्तिक मिलन होतं की मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित करण होतं. राजकारणात पुढेही त्यांची युती टिकून राहणार आहे का? याकडे प्रत्येक मराठी माणसाचे आणि देशातील ठाकरे घराण्यावर प्रेम करणाऱ्या किंवा महाराष्ट्रातील राजकारणावर लक्ष ठेवणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष आहे. हे दोन्ही बंधू एकच व्यासपीठावर येण्यामागे बरीचशी कारणे आहेत. मुळात ते एकाच वेळेला परदेशात गेले त्याच वेळेला या एकीची खरी गुढी उभारली गेली. बऱ्याच जणांच्या लक्षात नसेल की हे ठाकरे बंधू कुटुंबासह परदेशात गेले होते. परतल्यानंतर चर्चा करू आणि तोपर्यंत कुणीही प्रसार माध्यमांसमोर याबद्दल बोलू नये असे दोन्ही ठाकरेंनी ठरवले होते. त्यानंतर बऱ्याच वेळेला दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. तथापी शेवटी घालायचं तेच घडलं आणि हे दोघे ठाकरे बंधू एकत्र आले. याला बऱ्याचशा राजकीय पार्श्वभूमी आहेत. भाजपने शिवसेना फोडली आणि ती शिंदेच्या हातात दिली, बहुतांश मराठी माणसांना पटलं नाही. तसंच राज ठाकरे व त्यांचा पुत्र यांनाही पटलं नाही. तसे त्यांनी वेळोवेळी आपल्या भाषणातून बोलून दाखवले आहे. या दोन्ही बाजूंनी एकत्र यावं असं प्रत्येक मराठी जणांच्या मनात होतं आणि ते काल घडत असताना दोघांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसादात दोघांची भाषणे उत्स्फूर्त झाली. मात्र दोघांच्या भाषणात साम्य असं नव्हतं. कारण राज ठाकरेंना सध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणं साध्य नव्हतं कारण काल-परवापर्यंत ते त्यांच्या बरोबरच होते किंबहुना सत्ताधाऱ्यांच्या बाजूनेच होते म्हटलं तरी वाव ठरणार नाही.

त्याचबरोबर गेल्या चार-पाच वर्षात जे घडले आहे त्याची सगळ्यात मोठी झळ ही उद्धव ठाकरेंना बसलेली आहे. या ना त्या कारणाने 2014 पासून उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पार्टीने सतावले आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात महाविकास आघाडी घडली आणि त्याचे सुद्धा देशात परिणाम दिसू लागले. त्यानंतर भाजपने किंवा भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने शिवसेनेला तोडण्याचा चंग बांधला आणि महत्त्वाचा मोहरा एकनाथ शिंदें यांना फोडले. त्यानंतरही राज ठाकरे हे कधी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात बोलले नसले तरी शिवसेना तोडून ती दुसऱ्याच्या हातात देणार हे त्यांनाही पटलं नव्हतं. राज ठाकरे हे 2019 च्या निवडणुकीत पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात भाषण करत असले तरी नंतर भारतीय जनता पार्टीने किंवा सत्ताधाऱ्याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते थोडे नरमले आणि थोडे सौम्य झाले.
देशातल्या राजकारणात भाजपचे असलेला वर्चस्व हळूहळू कुठे ना कुठेतरी लोकशाही पायदळी तुडवत हुकूमशाही कडे वाटचाल अशा पद्धतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे हुकूमशाही पेक्षा लोकशाहीत चांगली घराणेशाही केंव्हाही बरी असं वाटू लागले. त्याच अनुषंगाने हे दोघे ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्र मुंबई, पुण्यासह देशभरात दिसणार हे मात्र नक्की. त्याचबरोबर शेवटी बेळगावसह सीमाभागातील मराठी माणसांमध्ये देखील हे दोघे बंधू एकत्र आल्याने एक उत्साहाचं वातावरण आहे. ठाकरे बंधूंच्या स्वरूपात मराठीचे हे एकत्रीकरण असंच अविरतपणे राहावं अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. ही इच्छा दोघे बंधू ते पूर्ण करतील अशी अपेक्षा बाळगाला काहीच हरकत नाही. दोन्ही बंधूंच्या मनात कुठे ना कुठे मराठी माणसासाठी एकत्र यावं भले ते राजकारणासाठी असेल तरीसुद्धा ते मराठी माणसाच्या भल्यासाठी असेल एवढी प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा आहे.
काल दोन्ही ठाकरे कुटुंबांच्या बॉडी लँग्वेज म्हणजे देहबोलीवरून असं वाटत होतं की कधीही दोन्हीही कुटुंब विभक्त झाली नाहीत. त्याच्यामुळेच ठाकरे बंधूंचे एकत्रीकरण हे अचानक घडलेल्या कुठल्याही गोष्टीमुळे झालेले नाही. त्यांचा भविष्यातला संपूर्ण अजेंडा ठरलेला आहे आणि त्याच मार्गावरून ते मार्गक्रमण करणार आहेत हे मात्र नक्की. राज ठाकरे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना जे जमलं ते बाळासाहेबांना किंवा इतरांनाही जमलं नाही. आम्हाला हिंदीच्या मुद्द्यावरून एकत्रित आणण्यात आलं आणि फडणवीस हे एकनाथ शिंदेंवर कुरघोडी करत आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी भविष्यात या ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणाचा बोध घेऊन शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील एकत्रित करावी, अशी प्रत्येक मराठी बहुजनांची अपेक्षा असून यात कांही वावग नाही.