belgaum

मराठा रेजिमेंटल सेंटरमध्ये 765 अग्निवीरांची शपथविधी परेड

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : भारतीय सैन्याच्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सातव्या तुकडीतील अग्निवीरांचा शपथविधी (अटेस्टेशन) सोहळा शनिवारी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे लष्करी परंपरेनुसार अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडला. 24 आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांनी या वेळी देशसेवेची शपथ घेतली.

या भव्य परेडचे परीक्षण मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांनी केले. त्यांनी अग्निवीरांच्या शिस्तबद्ध संचलनाचे, उत्कृष्ट टर्नआउटचे आणि उच्च दर्जाच्या ड्रिलचे कौतुक केले. परेडचे नेतृत्व अग्निवीर संकतेसिंह यांनी केले, तर मेजर गजानन पाटील यांनी परेड अॅडज्युटंट म्हणून जबाबदारी सांभाळली.

राष्ट्रीय ध्वज, रेजिमेंटल ध्वज आणि विविध धर्मग्रंथांच्या साक्षीने अग्निवीरांनी ‘ओथ ऑफ अफर्मेशन’ घेतली. या सोहळ्यास अग्निवीरांचे पालक, सेवारत व निवृत्त सैनिक, बेळगावातील मान्यवर, एनसीसी कॅडेट्स तसेच विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेची शपथ घेताना अग्निवीरांच्या चेहऱ्यावर दिसणारा अभिमान आणि आत्मविश्वास सोहळ्याचे आकर्षण ठरला.

 belgaum

यावेळी ब्रिगेडियर उपाध्याय यांनी नव्याने शपथबद्ध झालेल्या अग्निवीरांना मार्गदर्शन करताना मराठा लाईट इन्फंट्रीच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली. सैनिकांच्या जीवनात शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि कर्तव्यनिष्ठेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. रेजिमेंटल सेंटरमध्ये दिलेले प्रशिक्षण भविष्यातील सेवाकाळात निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रशिक्षणाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अग्निवीरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. ‘नाईक यशवंत घाडगे व्हिक्टोरिया क्रॉस मेडल’ हा सर्वोत्कृष्ट अग्निवीराचा प्रतिष्ठेचा पुरस्कार अग्निवीर आदर्श घोलप यांना प्रदान करण्यात आला.

सोहळ्याची सांगता रेजिमेंटच्या शूर वीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शरकत युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आली. तसेच देशसेवेसाठी आपल्या पाल्यांना प्रेरणा दिल्याबद्दल अग्निवीरांच्या पालकांचा ‘गौरव पदक’ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

हा सोहळा देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रसेवेच्या भावनेचा प्रेरणादायी संगम ठरला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.