belgaum

ग्रंथदिंडी, शोभायात्रेने मराठी शाळेच्या शतकोत्तर महोत्सवाला प्रारंभ

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :
कंग्राळी खुर्द (ता. जि. बेळगाव) येथील शंभर वर्षांची परंपरा लाभलेल्या सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या शतकोत्तर महोत्सवाला शनिवारी भव्य ग्रंथदिंडी आणि शोभायात्रेने दिमाखदार प्रारंभ झाला. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय महोत्सवात आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

एपीएमसी मार्केट यार्ड प्रवेशद्वारापासून गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडी व शोभायात्रेत मराठी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. भगवे फेटे परिधान केलेले माजी विद्यार्थी, सजवलेली बैलगाडी, बाल शिवराय व जिजाऊंची वेशभूषा, महिलांचे लेझीम पथक, वारकरी दिंडी आणि भगवे ध्वज यामुळे वातावरण उत्साहाने भारावून गेले होते. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा आनंद आणि उत्साह यावेळी विशेष लक्षवेधी ठरला.

शाळेच्या मैदानावर सकाळी १०.३० वाजता उद्घाटन समारंभ पार पडला. शाळेचे माजी विद्यार्थी व माजी मुख्याध्यापक टी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, समाजसेवक रमाकांत कोंडुसकर, उद्योजक सी. एम. पाटील, आर. आय. पाटील, संजय मोहनगेकर, ॲड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, विक्रम मुतगेकर, एसडीएमसी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

 belgaum

उद्घाटनपर भाषणात रमाकांत कोंडुसकर यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना, “ही शाळा आमची दुसरी आई आहे. आई-वडील आणि गावानंतर या शाळेमुळेच आमची ओळख जगभर निर्माण झाली,” असे सांगत शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर आर. एम. चौगुले यांनी शाळेतील ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर सुविधा यांचे कौतुक करत, या शाळेने अनेक विद्यार्थी देश-विदेशात यशस्वी घडविल्याचे नमूद केले.

उद्घाटनानंतर सातारा येथील हॅपी मेडिकेअर इंडियाचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी ‘विद्यार्थी व पालकांचे आरोग्य आणि सर्वांगीण विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात ‘माझ्या यशात शाळेचा वाटा’ या विषयावर माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन होणार असून, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवसाची सांगता होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.