belgaum

माजी विद्यार्थ्यांनी साधला शिक्षकांशी संवाद

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील ‘सरकारी आदर्श उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या’ भव्य शतकोत्तर महोत्सवाला आज, शनिवार दि. ३० मे रोजी अत्यंत उत्साहात सुरुवात झाली आहे. ज्ञानदानाची १०० वर्षांची गौरवशाली परंपरा साजरी करण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यांसह परदेशातूनही माजी विद्यार्थी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शाळेच्या प्रांगणात एकत्र आले आहेत. आज पहिल्या दिवशी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांसोबत संवाद साधत पुन्हा एकदा शालेय जीवनातील अविस्मरणीय क्षण अनुभवले.

आज सकाळी अत्यंत वैभवशाली वातावरणात ग्रंथदिंडी आणि भव्य शोभायात्रेने या ऐतिहासिक महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. या शोभायात्रेत भजनी मंडळे, लेझीम पथके, आजी-माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा पार पडला. दुपारच्या सत्रात साताऱ्याचे धनंजय पाटील यांचे “विद्यार्थी व पालकांचे आरोग्य आणि सर्वांगीण विकास” या विषयावर व्याख्यान पार पडले, तर सायंकाळी माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवसाची सांगता झाली.

प्राथमिक शाळा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील पहिली पायरी असते आणि या शाळेने गेल्या १०० वर्षांत अनेक पिढ्या घडवल्या आहेत. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊनच अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ‘मराठी शिकवा, मराठी वाढवा’ असा संदेश देत, प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला मातृभाषेतूनच शिक्षण देणे गरजेचे असल्याची भावना एका माजी विद्यार्थिनीने व्यक्त केली.

 belgaum

तर दुसऱ्या एका माजी विद्यार्थिनीने, “आमच्या एकाच कुटुंबातील तीन पिढ्या या शाळेत शिकल्या असून आम्ही आज जे काही ध्येय गाठू शकलो ते या शाळा आणि शिक्षकांमुळेच, त्यामुळे हा क्षण आमच्यासाठी अभिमानाचा आहे,” अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, उद्या रविवार दि. ३१ मे रोजी सकाळी १० वाजता ८० वर्षांवरील ज्येष्ठ माजी विद्यार्थी आणि विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थी आपल्या भावना आणि शाळेविषयीचे मनोगत व्यक्त करतील, तर सायंकाळी ५:३० वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रमाने या दोन दिवसीय सोहळ्याची सांगता होईल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.