belgaum

खानापुरात बेकायदेशीर बंदूक कारखान्याचा पर्दाफाश;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर पोलिसांनी एका मोठ्या बेकायदेशीर कट्टा (कंट्री मेड बंदूक) निर्मिती कारखान्याचा पर्दाफाश केला असून, याप्रकरणी तब्बल १३ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी कारवाई दरम्यान ९ गावठी पिस्तूल (कट्टे), मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि बंदूक तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या धडक कारवाईची सविस्तर माहिती दिली. खानापूर तालुक्यातील काटगाळी गावात हा बंदुका बनवण्याचा काळा व्यवसाय सुरू होता. या कारवाईत बंदूक बनवणारा मुख्य आरोपी, बंदूक खरेदी करणारे, बेकायदेशीरपणे दारूगोळ्याची विक्री करणारे आणि बंदुकीच्या बॅरेलचे वेल्डिंग करून देणारा अशा संपूर्ण साखळीलाच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले की, मुख्य आरोपी मारुती श्रीकांत सुतार (रा. काटगाळी, ता. खानापूर) हा २०१४ पासून आपल्या घरात बेकायदेशीरपणे गावठी बंदुका तयार करून लोकांची फसवणूक करत आणि विकत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.

 belgaum

खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सिद्राम अज्जप्पा हसरे यांनी ११ मे २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून, भारतीय हत्यार कायदा १९५९ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी ११ मे रोजी मुख्य आरोपी मारुती सुतार याला अटक केली आणि त्याच्याकडून एक अर्धवट तयार झालेली बंदूक जप्त केली. त्यानंतर त्याच्याकडून बंदुका खरेदी करणाऱ्या काटगाळी आणि मोदेकोप्पा परिसरातील सोमनाथ चौगुले, संतोष नायक, मारुती गुडद्यागोळ, बाळू नायक, लक्ष्मण गुजनाळ, बसवराज सालोटगी, बसवंत यरमाळकर, लक्ष्मण गुरव आणि बंदूक बनवण्यासाठी आगाऊ पैसे देणारा मरियाप्पा नायक अशा नऊ जणांना अटक करून त्यांच्याकडून प्रत्येकी एक याप्रमाणे आठ तयार बंदुका जप्त केल्या.

या प्रकरणाच्या सखोल तपासात ही साखळी थेट शेजारील उत्तर कन्नड जिल्हा आणि बंदूक दुकानांपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले. मारुती सुतार याला बंदुकीचे सुटे भाग आणि दारूगोळा पुरवणाऱ्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील जोयडा तालुक्यातील रामनगर येथील बुक स्टॉल मालक विश्वनाथ उर्फ संतोष सीताराम देसाई याला १२ मे रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडून बंदुकीचे २१ गियर, ५ हेड, १५ निप्पल, सिलिंग बेल्ट, ३४ दारूगोळ्याची पाकिटे, ४४९ शिशाच्या गोळ्या, ४२० कॅप्स आणि ४८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

धक्कादायक बाब म्हणजे, बेळगाव शहरातील खंजर गल्ली येथील ‘अवीज गन शॉप’चा परवाना २०२१ मध्येच संपला असतानाही, तिथला मालक विजय अप्पाजी अनगोळकर याने आपल्या दुकानातील शिल्लक दारूगोळा आणि सुटे भाग बेकायदेशीरपणे विश्वनाथ देसाई याला विकले होते, त्यामुळे विजय अनगोळकर यालाही १३ मे रोजी अटक करण्यात आली. तसेच, देसूर गावाजवळ महामार्गालगत मारुती सुतार याला बंदुकीच्या बॅरेलचे वेल्डिंग करून देणारा वेल्डिंग शॉप चालक महेश मारुती लक्केबैलकर यालाही १३ मे रोजी अटक करून त्याचे वेल्डिंग मशीन जप्त करण्यात आले.

पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बैलहोंगल डीएसपी यांच्या नेतृत्वाखाली खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एल. एच. गौंडी आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कामगिरी केली. अटक करण्यात आलेल्या सर्व १३ आरोपींना न्यायालयात हजर केले असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची मोठी साखळी उद्ध्वस्त करणाऱ्या संपूर्ण पोलीस पथकाच्या या कामगिरीचे एसपी के. रामराजन यांनी जाहीर कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.