belgaum

त्या..दरोड्याचा मास्टरमाईंड निघाला फिर्यादीचाच मित्र!

0
SP RAMRAJAN
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गोव्याला जाणाऱ्या सुवर्णकारांचे अपहरण करून, पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून भरदिवसा दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा बेळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या खळबळजनक प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती अत्यंत धक्कादायक माहिती लागली असून, खुद्द फिर्यादीच्याच मित्रांनी या दरोड्याची संपूर्ण स्क्रिप्ट लिहिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण ८ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पश्चिम बंगालचे मूळ रहिवासी असलेले आणि सध्या बेळगावच्या शहापूर येथे राहणारे एस. के. इबादुल यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. इबादुल हे त्यांचे मित्र रबीउल गाझी आणि अली हुसेन मंडल यांच्यासोबत कारने गोव्याला चालले होते. दरम्यान, खानापूर तालुक्यातील उचवडा गावाजवळील बैलूर क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्ग ७48 वर काही अज्ञात बदमाशांनी त्यांची कार अडवली. बदमाशांनी तिघांनाही कारमधून ओढत रस्त्याशेजारील शेतात नेले आणि तिथे त्यांना पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. दरोडेखोरांनी इबादुल यांच्याकडील १,००,२०0 रुपयांची रोकड आणि रबीउल गाझी याच्याकडील २२५ ग्रॅम सोने लुटून पोबारा केला होता.

या हायप्रोफाइल दरोड्याचा तपास करताना पोलिसांच्या हाती लागलेल्या पुराव्यांनी पोलीसही चक्रावून गेले. ज्या रबीउल गाझी आणि अली हुसेन मंडल यांना पीडित मानले जात होते, तेच या दरोड्याचे मुख्य सूत्रधार निघाले. त्यांनी शहापूर येथील सादीक तोरगल याच्याशी संगनमत करून हा दरोडा रचला होता. यासाठी त्यांनी विवेक चंद्रकांत पाटील याला ३ लाख रुपयांची सुपारी दिली होती. सुपारी घेतल्यानंतर विवेक पाटील याने आपल्या इतर चार साथीदारांच्या मदतीने महामार्गावर हा थरारक दरोडा घडवून आणला.

 belgaum

पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत रबीउल रुहुल अमीन गाझी, अली हुसेन कवीरुद्दीन मंडल, सादीक अब्दुल रहमान तोरगल, विवेक चंद्रकांत पाटील, प्रशांत महादेव चव्हाण, नितीन राजाराम चव्हाण, दिगंबर नागेश पाटील आणि मयूर राजू घाडी या बेळगाव शहरातील आठही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या या आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या ३ कार (सुझुकी ब्रेझा, एर्टिगा व अन्य एक), १ मोटारसायकल, १,००,२०० रुपयांची रोकड, कट्टा पिस्तूल, चाकू, ८ मोबाईल आणि २०५ ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे बिस्कीट असा एकूण ४०,५०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.