बेळगाव लाईव्ह : केरळमधील एझिमला येथील ‘इंडियन नेव्हल अकॅडमी’ (आयएनए) मध्ये पार पडलेल्या दिमाखदार दीक्षांत संचलनात ३११ प्रशिक्षणार्थींसोबत बेळगावचा सुपुत्र वंश बेन्नाळकर हा देखील देशसेवेची शपथ घेत भारतीय नौदलात सब लेफ्टनंट पदावर दाखल झाला आहे.
या दिमाखदार संचलनाची पाहणी आणि पुनरीक्षण दळणवळण विभागाचे दक्षिण नौदल कमांडचे व्हाईस ॲडमिरल समीर सक्सेना यांनी केले. या सोहळ्यात व्हिएतनाम, सेशेल्स आणि टांझानिया या देशांतील ६ आंतरराष्ट्रीय कॅडेट्ससह इतर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कठीण आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण पूर्ण करून भविष्यातील सक्षम सागरी दलाचे नेतृत्व करण्यासाठी हे तरुण अधिकारी आता सज्ज झाले आहेत. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी ते चारित्र्याला पर्याय ठरू शकत नाही आणि नेतृत्व, धैर्य व नैतिक निष्ठाच विजय मिळवून देतात, असे व्हाईस ॲडमिरल समीर सक्सेना यांनी प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना सांगितले.
मूळचे बेळगाव जिल्ह्यातील कंग्राळी खुर्द येथील रहिवासी असलेले बेन्नाळकर कुटुंब आता खऱ्या अर्थाने देशसेवेचे प्रतीक बनले आहे. वंश बेन्नाळकर यांच्या रूपाने या एकाच कुटुंबातील तिसरी व्यक्ती भारतीय संरक्षण दलात उच्च पदावर देशसेवा करणार आहे. त्यांचे वडील कृष्णा बेन्नाळकर हे सैन्यदलातून कर्नल पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत, तर त्यांचे मोठे भाऊ अंशुल बेन्नाळकर हे सध्या भारतीय सैन्यदलात मेजर पदावर कार्यरत आहेत. आता धाकटा मुलगा वंश देखील नौदलात अधिकारी बनल्याने बेन्नाळकर कुटुंबीयांची देशसेवेची परंपरा अखंड सुरू राहिली आहे.

आपल्या मुलांच्या या यशाबद्दल बोलताना सेवानिवृत्त कर्नल कृष्णा बेन्नाळकर यांनी सांगितले की, स्वतः १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर सैन्यात भरती होऊन अडचणींवर मात करत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. आपल्या मराठा समाजातील आणि ग्रामीण भागातील मुलांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे, हेच आपले नेहमीचे ध्येय राहिले आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास येथील तरुण खडतर टप्पे सहज पार करू शकतात, असा विश्वास कृष्णा बेन्नाळकर यांनी व्यक्त केला.
भारतीय नौदलात सब लेफ्टनंट पदाची वर्दी अंगावर चढवणारे वंश बेन्नाळकर यांनी विविध ठिकाणी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. यामध्ये भीमपूर, नागालँड, राजस्थान, जम्मू येथील आर्मी स्कूलसह बेळगावमधील केएलई इंटरनॅशनल स्कूलचा समावेश आहे. त्यानंतर त्यांनी व्हीआयटी वेल्लोर येथून बी.टेक.ची पदवी घेतली आणि पहिल्याच प्रयत्नात नौदलाची परीक्षा उत्तीर्ण केली. संरक्षण दलात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी ध्येयापासून विचलित न होता वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियांची योग्य माहिती घेऊन प्रयत्न करावेत, असा संदेश वंश बेन्नाळकर यांनी दिला आहे.
एकाच घरातील तीन वीर देशसेवेसाठी कटिबद्ध असण्याचा हा ऐतिहासिक क्षण बेन्नाळकर कुटुंबीयांसाठी अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय असाच आहे. आपल्या मातीतील एका तरुणाने कठोर मेहनतीच्या जोरावर नौदलात ‘सब लेफ्टनंट’ पदाला गवसणी घातल्यामुळे संपूर्ण बेळगावकरांची छाती अभिमानाने फुलली असून, हा पराक्रम ग्रामीण भागातील इतर युवकांसाठीही देशसेवेची एक नवी प्रेरणा ठरणार आहे.




