बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रा पाठोपाठ बेळगावातील कानडी संघटनांकडून हिंदी सक्ती विरोधात आंदोलने सुरु झाली आहेत कर्नाटक राज्यात शाळांमध्ये फक्त कन्नड आणि इंग्रजी भाषा सक्तीचे करून द्विभाषा सूत्र अंमलात आणावे. सध्या असलेली हिंदी ही तृतीय भाषा पाठ्यक्रमातून काढून टाकावी, या मागणीसह यासंदर्भातील विविध मागण्या कर्नाटक रक्षण वेदिकेने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.
कर्नाटक रक्षण वेदिकेतर्फे (करवे) आज शनिवारी सकाळी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित मुख्यमंत्र्यांकडे पाठविले जाईल असे आश्वासन दिले. कर्नाटकातील शालेय पाठ्यक्रमामध्ये सध्या कन्नड प्रथम भाषा इंग्रजी द्वितीय भाषा आणि हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकवली जात आहे. पाठ्यक्रमातील तृतीय भाषा हिंदी ही सक्तीचे असण्याबरोबरच एसएससी परीक्षेत हिंदीचा 100 मार्कांचा पेपर असतो. तथापि हिंदी भाषा कन्नड मुलांसाठी अवघड ठरत असून गेल्या 2024 मधील एसएसएलसी परीक्षेत बरेच विद्यार्थी हिंदी विषयात अनुत्तीर्ण झाले होते.
यंदाच्या 2025 मधील परीक्षेमध्येही तीच परिस्थिती झाली. थोडक्यात या पद्धतीने हिंदीच्या सक्तीमुळे कन्नड विद्यार्थ्यांना त्रास होत असून त्यांच्या शैक्षणिक भवितव्याला बाधा पोहोचत आहे. यासाठी कर्नाटकातील शाळांमध्ये फक्त कन्नड आणि इंग्रजी भाषा सक्तीचे करून द्विभाषा सूत्र अंमलात आणावे. द्विभाषा सूत्र राबवण्यासाठी सध्या असलेली हिंदी ही तृतीय भाषा पाठ्यक्रमातून काढून टाकावी.
राज्य आणि केंद्रीय शैक्षणिक व्यवस्था असलेल्या सीबीएसई सारख्या शाळांनी देखील हे द्विभाषा सूत्र अंमलात आणले पाहिजे. या शाळांमध्ये कन्नड भाषा ही प्रथम भाषा म्हणून सक्तीची केली जावी. कन्नड शाळा अधिक सक्षम होण्यासाठी त्या ठिकाणी उत्तम गुणवत्तापूर्ण इंग्रजी शिक्षण दिले जावे. आमच्या या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पूर्तता केली जावी, अशा आशयाचा तपशील करवेने मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी कर्नाटक रक्षण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी, सरचिटणीस दशरथ बनोशी, उपाध्यक्ष राजू नाशिपुडी, गणेश रोकडे, राज्य संचालक सुरेश गवन्नवर आदिंसह बरेच करवे कार्यकर्ते उपस्थित होते.