बेळगाव लाईव्ह :ह्युमॅनिटी फाउंडेशन आणि पायना संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि. 6 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता बेळगाव जिल्ह्यात प्रथमच ‘तल्की’ हे संपूर्णपणे तृतीय पंथीयांच्या भूमिका असलेले त्यांच्या जीवनावरील नाटक कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे सादर केले जाणार आहे, अशी माहिती पायना संस्थेच्या सरचिटणीस सविता यांनी दिली.
कन्नड साहित्य भवन येथे आज शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. सविता यांनी सांगितले की, तल्की या नाटकाचे आम्ही आतापर्यंत म्हैसूर फेस्टिवल, दिल्ली फेस्टिवल, बडोदा अहमदाबादसह कर्नाटकातील विविध शाळा -कॉलेजेसमध्ये 27 प्रयोग केले असून बेळगावमध्ये उद्या होणारा 28 वा प्रयोग असणार आहे.

या नाटकाचा मुख्य उद्देश तृतीय पंथीयांच्या बाबतीतील गैरसमज दूर करणे. तसेच त्यांचे जीवन, त्यांच्या भावना, त्यांचा संघर्ष, त्रास सर्वसामान्य लोकांना कळावा आणि त्यांच्या मनातील तृतीयपंथीयांबाबतचा सापत्नभाव दूर व्हावा हा आहे. आज तृतीयपंथीयांची नवी पिढी चांगले शिक्षण घेऊन आपले स्वप्न पूर्ण करत आहेत. अन्यथा यापूर्वी तृतीयपंथीयांचे आयुष्य भिक मागण्यात आणि वेश्याव्यवसाय करण्यात गेले आहे. आता सरकार देखील राज्य व राष्ट्र स्तरावर तृतीयपंथीय समुदायाला अनेक सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांना शिक्षण, रोजगार वगैरेमध्ये संधी निर्माण झाल्या आहेत. तथापी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या आमचा समुदाय समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे.
त्यासाठी तृतीयपंथीयांनी आपल्या समस्यांबाबत आवाज उठवून पुढे सरसावले पाहिजे. तल्की हे नाटक त्याचाच एक भाग असून ज्यामध्ये 45 वर्षावरील आणि 60 वर्षाखालील तृतीयपंथीयांच्या भूमिका आहेत. तृतीयपंथीयांच्या बाबतीतील समाजाचा दृष्टिकोन बदलावा, गैरसमज दूर व्हावेत याचा प्रयत्न या नाटकाद्वारे करण्यात आला आहे.
सदर नाटकासाठी प्रवेश विनामूल्य असून बेळगाव शहरवासीयांनी बहुसंख्येने हजेरी लावून नाटकाचा प्रयोग यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन सविता यांनी शेवटी केले. पत्रकार परिषदेस तल्की नाटकाचे दिग्दर्शक श्रीजीत सुंदर, संपत दोडमनी, ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या प्रवक्त्या किरण बेरी आदींसह पायना संस्थेच्या अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या.