बेळगाव लाईव्ह :मुसळधार पावसामुळे संपूर्ण घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शहरातील काकतीवेस येथील श्री हरळय्या समाजाच्या वसाहतीत काल शुक्रवारी सायंकाळी घडली. घर कोसळले त्यावेळी घरातील मंडळी यात्रेला गेली असल्यामुळे अनर्थ टळला.
कोसळलेले घर हे प्रतिभा मंजुनाथ कांबळे यांच्या मालकीचे होते. मिळालेल्या माहितीनुसार काकतीवेस गल्ली येथील श्री हरळय्या (समगार) समाजाच्या वसाहतीतील प्रतिभा कांबळे आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत म्हणजे आपले पती आणि तीन मुलांसह गोकाक येथील श्री महालक्ष्मी यात्रेला गेले होते. त्यानंतर सध्या पडणाऱ्या पावसामुळे काल शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे संपूर्ण घर कोसळून उध्वस्त झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घर कोसळल्याची माहिती शेजाऱ्यांनी कांबळे कुटुंबीयांना देताच ते तातडीने घराकडे धावून आले. त्यावेळी घरातील भांडीकुंडी कपडेलत्ते, अन्नधान्य सर्व कांही घराच्या कोसळलेल्या ढिगार्याखाली गाडले गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सदर घटनेची माहिती मिळताच आज शनिवारी सकाळी बेळगावचे तलाठी श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी बेळगाव लाईव्हशी बोलताना त्यांनी पावसामुळे कांबळे यांचे संपूर्ण घर पडल्याचे सांगितले. सुदैवाने घरातील मंडळी यात्रेला गेली असल्यामुळे कुणाच्याही जीवाला धोका झाला नसल्याचे सांगून संपूर्ण घर कोसळले असल्यामुळे नुकसानग्रस्त मंजुनाथ कांबळे यांना सरकारी नियमानुसार 2 लाख 40 हजार रुपयांची नुकसान भरपाई सरकारकडून दिली जाईल, असे आश्वासन तलाठी शिंदे यांनी दिले. याप्रसंगी स्थानिक नगरसेवक मुजम्मिल डोणी, महापालिका व महसूल खात्याचे कर्मचारी तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

पीडित प्रतिभा मंजुनाथ कांबळे यांनी यावेळी बोलताना यात्रेसाठी आम्ही गोकाकला गेलो होतो आणि काल सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास पावसामुळे आमचे संपूर्ण घर कोसळले आहे. घर कोसळल्याची माहिती शेजाऱ्यांनी देताच आम्ही येथे आलो. त्यानंतर घराच्या ढिगार्याखाली गाडल्या गेलेल्या सुस्थितीतील चीजवस्तूं आम्ही कशाबशा बाहेर काढल्या आहेत.
घर कोसळल्यामुळे आमचे छप्पर हरवले असून सध्या मी आमच्या शेजाऱ्यांच्या घरी रहात आहोत अशी माहिती दिली. नगरसेवक मुजम्मील डोणी यांनी देखील घटनेची थोडक्यात माहिती देऊन सरकारकडून नुकसानग्रस्त कांबळे कुटुंबाला 2 लाख 40 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल. त्याशिवाय बेळगाव उत्तरच्या आमदारांकडून देखील आणखी मदत मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे असे स्पष्ट केले.